नागपुरातील कुख्यात गवत्या राऊत स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:44 PM2020-07-30T23:44:41+5:302020-07-30T23:45:56+5:30
अजनीतील कुख्यात गुंड गौतम ऊर्फ गवत्या देवीदास राऊत (वय २८) याच्याविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई करून त्याला कारागृहात डांबण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनीतील कुख्यात गुंड गौतम ऊर्फ गवत्या देवीदास राऊत (वय २८) याच्याविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई करून त्याला कारागृहात डांबण्यात आले. कुख्यात गवत्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौशल्यानगर गल्ली नंबर ९ मध्ये राहतो. त्याच्याविरुद्ध १५ गंभीर गुन्हे दाखल असून तो अट्टल गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याला १९ एप्रिल २०१४ रोजी पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत अटक करून कारागृहात डांबले होते. एक वर्षानंतर तो बाहेर आला आणि परत गुन्हेगारीत सक्रिय झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र त्याची गुन्हेगारी सुरूच होती. त्यामुळे २०१७ मध्ये गवत्याविरुद्ध पुन्हा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तो वारंवार कारवाई करूनही जुमानत नसल्याचे पाहून ३ आॅगस्टला परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांनी त्याच्याविरुद्ध पुन्हा हद्दपारीची कारवाई केली. दोन वर्षात त्याला नागपुरात येण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र कुख्यात गवत्या नागपुरात येऊन गुन्हेगारीतही सक्रिय होता. मार्च २०२० मध्ये तो तडीपार असूनही त्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. तर, एप्रिल महिन्यात तो तलवार घेऊन धुमधाम करताना आढळला. जून महिन्यात तो साथीदारांसह दरोडा घालण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला पकडले.
तो मोकाट असल्यामुळे कुणाला धोका होऊ शकतो हे लक्षात आल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्याला एमपीडीए लावून कारागृहात डांबण्यातचे आदेश दिले. त्यानुसार गवतेविरुद्ध बुधवारी एमपीडीएच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. त्याला कारागृहात डांबण्यात आले.
हाफ सेंच्युरी पूर्ण
पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्या कार्यकाळात झालेली ही एमपीडीए ची ५० वी कारवाई ठरली. पोलीस आयुक्त उपाध्याय यांनी गेल्या चोवीस महिन्यात ४९ कुख्यात गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए लावण्याचे आदेश देऊन त्यांना कारागृहात डांबले. बुधवारी करण्यात आलेल्या गवत्यावरील कारवाईमुळे नागपुरात एमपीडीएची हाफ सेंच्युरी पूर्ण झाली आहे.