आता ‘ड्रोन’ करणार वायुप्रदुषणाचे ‘निरीक्षण’ : ‘नीरी’च्या वैज्ञानिकांचे संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 11:07 PM2019-10-28T23:07:43+5:302019-10-28T23:08:56+5:30
‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) वैज्ञानिकांच्या भगीरथ प्रयत्नाने . ‘ड्रोन’च्या माध्यमातून वायुप्रदूषणाची पातळी मोजणे शक्य होणार असून या तंत्रज्ञानाला त्यांनी ‘निरीक्षण’ असे नाव दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या काळामध्ये वायुप्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. परंतु अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे जमिनीपासून उंचावर तसेच इमारतींच्या वरील मजल्यांवर, दोन इमारतींच्या मध्ये येणाऱ्या भागात वायुप्रदूषणाची पातळी किती आहे हे मोजणे अशक्य असते. हीच बाब लक्षात घेऊन ‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) वैज्ञानिकांनी भगीरथ प्रयत्न केले व एक अनोखी कल्पना प्रत्यक्षात आणली. ‘ड्रोन’च्या माध्यमातून वायुप्रदूषणाची पातळी मोजणे शक्य होणार असून या तंत्रज्ञानाला त्यांनी ‘निरीक्षण’ असे नाव दिले आहे.
संगणक यंत्रणेच्या साहाय्याने ठिकठिकाणच्या वायुप्रदूषणाचा अंदाज बांधणे कठीण आहे. नमुन्याची किंमत, ठिकाणांची आणि निरीक्षण तज्ज्ञांची अनुपलब्धता हे देखील अनेकदा हवेच्या गुणवत्ता निरीक्षणात अडथळे म्हणून उभे राहू शकतात. साधारणत: एखाद्या वाहनावर ‘सेन्सर्स’ लावून मग ‘डाटा’ एकत्रित करण्यात येतो. परंतु उंचीवर नमुने घेता येत नाही. ‘नीरी’च्या संशोधकांनी अभिनव प्रयोगाला सुरुवात केली. त्यांनी व्यावसायिक ‘ड्रोनवर’ एक प्रयोग विकसित केला. यात अतिशय कमी वजनाचे ‘सेन्सर’ लावण्यात आले आहेत. गरज आणि क्षमतेनुसार विविध ‘सेन्सर’ या ‘ड्रोन’ला जोडले जाऊ शकतात. ही यंत्रणा शहरी आणि ग्रामीण भागात विविध उंचीवर जाऊन हवा गुणवत्तेच्या पीएम, एसओटू, एनओएक्स, सीओ यासारख्या विविध मापदंडाचा अभ्यास करू शकते. ‘नीरी’चे मुख्य वैज्ञानिक डॉ.नितीन लाभसेटवार, पीयूष कोकाटे, डॉ.अनिर्बान मिडडे, अंकित गुप्ता, सागर निमसडकर यांच्या चमूने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
‘झेड अॅक्सिस’वरील नवे तंत्रज्ञान
या नव्या यंत्रणेतील ‘मल्टी-रोटर’ यूएव्ही तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय सेन्सर यामुळे आकाशातील अडथळ्यांसह शहरी वातावरणातील गर्दीतसुद्धा ‘झेड एक्सिस’ वरील ‘डाटा’ मिळू शकतो. हा ‘डाटा’ भरवशाचा मानल्या जातो. शिवाय या माध्यमातून हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जाऊ शकतात. ‘नीरी’च्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या या यंत्रणेमुळे शहराच्या विविध भागातील उंच इमारतीत राहणाºया नागरिकांना वायु प्रदूषणाच्या धोक्याची माहिती मिळू शकेल. वायू प्रदूषण किंवा हवा गुणवत्ता मोजण्याच्या पूर्वीच्या पद्धतीपेक्षा ही नवीन युएव्ही आधरित पद्धत अधिक सोपी आणि व्यवहार्य आहे, अशी माहिती पीयूष कोकाटे यांनी दिली. ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार यांचे आम्हाला मौलिक मार्गदर्शन लाभले असेदेखील त्यांनी सांगितले.
‘सेन्सर्स’ बसविण्याचे होते आव्हान
‘नीरी’च्या वैज्ञानिकांसमोर सर्वात मोठे आव्हान होते ते ‘ड्रोन’वर ‘सेन्सर्स’ बसविण्याचे. उंचीवर असताना हवेच्या दाबामुळे व वेगामुळे ‘सेन्सर्स’ हलू शकतात व त्यामुळे ‘डाटा’ चुकीच्या पद्धतीने मोजल्या जाऊ शकतो. परंतु या तंत्रज्ञानात हवेचा कुठलाही परिणाम होत नाही.