नागपूर : भारतात तयार करण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचा पहिला टप्प्याची वाटचाल पूर्णत्वाकडे सुरू आहे. ही लस इंट्रा व्हॅस्कुलर म्हणजे धमनीमध्ये दिली जाणारी आहे. आता याच लसीचा इंट्राडर्मल म्हणजे त्वचेत दिल्या जाणाºया लसीची मानवी चाचणी होणार आहे. यासाठी राज्यात नागपुरातील रामदासपेठ येथील एका खासगी हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे.
भारत बायोटेक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) व इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या तीन संस्थाच्या देखरेखेत इंट्रा व्हॅस्कुलर कोव्हॅक्सिन लसीची मानवी चाचणीला सुरुवात झाली. राज्यात नागपूरच्या गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५५ व्यक्तींना पहिला व दुसरा डोज देण्यात आला. १४ व २८ दिवसानंतर या सर्वांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यातही आले. ४२ व्या दिवशी पुन्हा रक्ताचे नमुने घेऊन त्यानंतर लसीच्या प्रभावाचा निष्कर्ष काढला जाणार आहे. दरम्यान, याच कंपनीचे इंट्रा डर्मल दिले जाणारे कोव्हॅक्सिन लसीची मानवी चाचणीला मंजुरी मिळाली आहे. देशात १२ ठिकाणी चाचणी होणार आहे
नागपुरात सुरुवातीला २० लोकांवर ही लस दिली जाणार आहे. साधारण सोमवार-मंगळवारपासून याची नोंदणी सुरू होईल. ही लस त्वचेत दिली जाणारी असल्याने फार कमी डोस लागतो. यामुळे जास्तीत जास्त लोकांना देणे शक्य होणार आहे. याची किमतही इंट्रा व्हॅस्कुलरच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे.