लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील उद्योग संघटनांच्या मागणीनंतर राज्य शासनाने गुरुवारी अधिसूचना काढून २० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा उद्योगांना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यासह नागपूर जिल्ह्यातील उद्योगांना दिलासा मिळाला असून बंद असलेले स्टील व फॅब्रिकेशन उद्योग नव्याने सुरू होणार आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर उद्योगपूरक निर्णय राज्य शासनाने घेतल्याचे उद्योजकांनी सांगितले. स्थानिक, राज्य व केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी औद्योगिक क्षेत्राला ऑक्सिजन पुरवठा स्थगित करण्याचा निर्णय १४ एप्रिलला घेतला होता. त्यानंतर राज्यातील ऑक्सिजनवर अवलंबून असणारे उद्योग बंद झाले होते. हा आदेश रद्द करण्याची मागणी उद्योजकांनी १५ दिवसांपासून राज्य शासनाकडे लावून धरली होती. अखेर राज्य शासनाने निर्णय घेत उद्योगांना दिलासा दिला आहे.
उद्योजक म्हणाले, उद्योगांनी साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी ऑक्सिजन वापरणारे युनिट बंद करून प्रशासनास सहकार्य केले. पण सध्या रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. ज्या उद्योगात ऑक्सिजन तयार होतो, अशा उद्योगांना ऑक्सिजन वापरण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. छत्तीसगड, राजस्थान या राज्यांनी ऑक्सिजन उद्योगात उपयोगात आणण्याचे आदेश पूर्वीच दिले आहेत.
नागपुरात दहा रिफिलिंग, दोन हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे आणि उद्योगात ऑक्सिजन निर्मितीचे ३० प्रकल्प आहेत. हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या एका प्रकल्पाची क्षमता ९० मेट्रिक टन आणि दुसऱ्याची २१ मेट्रिक टन आहे. नागपुरात दरदिवशी १८,५०० जंबो सिलिंडर रिफिलिंगची क्षमता आहे. त्यापैकी १५ हजार सिलिंडर प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. हे सिलिंडर रिफिलिंग करून वैद्यकीय क्षेत्रात उपयोगात आणले जातात. नागपुरात नव्याने २५ ते ३० ऑक्सिजनचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची मुबलकता वाढणार आहे. कदाचित कोरोनाची तिसरी लाट आल्यास सर्व ऑक्सिजनचा पुरवठा वैद्यकीय क्षेत्राला करता येईल.
लहान-मोठ्या उद्योगांना दिलासा
उत्पादनाच्या क्षमतेत २० टक्के ऑक्सिजन उद्योगात वापरण्याची परवानगी राज्य शासनाने दिल्याने लहान-मोठ्या उद्योगांना दिलासा मिळाला आहे. ही क्षमता ४० टक्क्यांपर्यंत वाढवावी. जिल्ह्यानुसार कोरोना रुग्णांची संख्या पाहून जिल्हाधिकारी ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय लवकरच घेतील.
प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स इंडस्ट्रीज असोसिएशन.