आता नागपूर जि.प., मनपा शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 08:40 PM2019-04-27T20:40:58+5:302019-04-27T20:43:12+5:30
शालेय विद्यार्थ्यांमधील चौकसपणा व सृजनशील कलागुणांना वाव मिळावा, विज्ञान व गणित विषयाची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने समग्र शिक्षा अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात येत आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील १७ शाळांचा समावेश आहे. एका शाळांमध्ये हे केंद्र उभारण्यासाठी अंदाजे ३ ते ४ लाखाचा खर्च अपेक्षित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शालेय विद्यार्थ्यांमधील चौकसपणा व सृजनशील कलागुणांना वाव मिळावा, विज्ञान व गणित विषयाची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने समग्र शिक्षा अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात येत आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील १७ शाळांचा समावेश आहे. एका शाळांमध्ये हे केंद्र उभारण्यासाठी अंदाजे ३ ते ४ लाखाचा खर्च अपेक्षित आहे.
नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व मनपा शाळा अशा एकूण १७ शाळांमध्ये हे सायन्स सेंटर उभारण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा असो की महापालिकेच्या, विज्ञानाच्या प्रयोगशाळेचा अभाव आहे. प्रयोगशाळांच्या अभावी या शाळांमधील विद्यार्थ्यांना आवड व इच्छा असतानाही विज्ञान विषयातील विविध प्रयोग करण्यापासून वंचित राहावे लागते. या सायन्स सेंटरचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होणार आहे. शिक्षण विभागाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील १७ शाळांची निवड केली आहे. या प्रत्येक शाळांमध्ये ही सायन्स लॅब उभारण्यात येत आहे. यासाठी राज्यस्तरावरुन राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेअंती क्युरीऑन एज्युकेशन प्रा.लि. ठाणे यांची पुरवठादार कंपनी म्हणून निवड करण्यात आली आहे. शाळांमध्ये विज्ञान केंद्र उभारल्यानंतर त्या शाळेतील संबंधित गणित व विज्ञान विषय हाताळणारे शिक्षक, गटसाधन केंद्रांतर्गत कार्यरत, विज्ञान व गणित विषय साधनव्यक्ती यांना नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रातील साहित्याव्दारे विद्यार्थ्यांना शिकवणे, साहित्याची हाताळणी तसेच साहित्याच्या उपयोगितेबाबतचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर देण्यात येणार आहे. या केंद्रासाठी मंजूर शाळेतील गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या शाळांमध्ये सायन्स केंद्राची निर्मिती
तालुका शाळेचे नाव
नागपूर (ग्रा.) जि.प.उ.प्रा.शाळा बोरी
हिंगणा जि.प.उ.प्रा.शाळा बीड गणेशपूर
कामठी जि.प.उ.प्रा.शाळा महालगाव
काटोल न.प.शाळा क्र.२
नरखेड जि.प.उ.प्रा.शाळा मोहगांव भदाडे
सावनेर जि.प.उ.प्रा.शाळा सिल्लेवाडा
सावनेर जि.प.उ.प्रा.शाळा वलनी क्र.२
कळमेश्वर जि.प.उ.प्रा.शाळा उबाळी
उमरेड जि.प.उ.प्रा.शाळा हेवती
पारशिवनी जि.प.उ.प्रा.शाळा माहुली
भिवापूर जि.प.उ.प्रा.शाळा महालगाव
कुही जि.प.उ.प्रा.शाळा चापेगडी
रामटेक जि.प.उ.प्रा.शाळा आजनी
मौदा जि.प.उ.प्रा.शाळा चाचेर
नागपूर मनपा, सुरेंद्रगड हिंदी प्राथ. शाळा
नागपूर मनपा, संत कबीर हिंदी प्राथ. शाळा
नागपूर गरीब नवाज उर्दू स्कूल