आता पाँझी योजनांमध्ये लोकांची फसवणूक थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:34 AM2019-02-28T10:34:30+5:302019-02-28T10:36:25+5:30
कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट परतावा अर्थात पाँझी योजनांमध्ये गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वटहुकूमामुळे थांबणार आहे.
मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट परतावा अर्थात पाँझी योजनांमध्ये गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वटहुकूमामुळे थांबणार आहे. नव्या वटहुकूमान्वये अशा योजना सुरू करणाऱ्यांना १ ते १० वर्षे शिक्षा आणि अशा व्यक्तीश २ लाख ते ५० कोटींपर्यंत दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पाँझी योजना राबविणाऱ्यांवर आळा बसणार आहे. पण लोकांनाही जागृत होऊन फसव्या आर्थिक योजनांपासून दूर राहण्याची गरज असल्याचे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे.
पाँझी योजना म्हणजे काय
गुंतवणूक केलेल्या रकमेचे कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून राबविण्यात येणाऱ्या योजनांना पाँझी योजना म्हणतात. विविध फसव्या योजनांच्या माध्यमातून लोकांना गुंतवणूक करण्यास बाध्य करण्यात येते. तशी जाहिरातही कंपनीच्या संचालकांतर्फे प्रकाशित करण्यात येते किंवा मौखिक प्रसिद्धी करून लोकांना योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची लालूच दाखविण्यात येते. या सर्व योजनांमध्ये परताव्याची साखळी बंद झाल्यास गुंतवणूकदाराला दुप्पट परतावाच नव्हे तर साधे मुद्दलही मिळत नाही. अखेर कंपनीच्या संचालकांनी पलायन केल्यानंतर गुंतवणूकदारांना न्यायालयाची पायरी चढावी लागते.
नागपुरात पाच हजार कोटींपेक्षा अधिक फसवणूक
नागपुरात गेल्या काही वर्षांत अनेक ठगबाजांनी राबविलेल्या पाँझी योजनांच्या माध्यमातून लोकांची पाच हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाली आहे. प्रमोद अग्रवाल यांनी लोकांना जमिनीत गुंतवणूक करण्याचे आवाहन करीत दोन वर्षांत रक्कम दुप्पट देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांनी गुंतवणुकदारांची जवळपास ५०० कोटींची फसवणूक केली आहे.
श्रीसूर्या समूहाचे समीर जोशी, वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचे प्रशांत वासनकर, सात्त्विक इन्व्हेंस्टमेंटचे अमोल ढाके, रविराज इन्व्हेस्टमेंटचे राजेश जोशी, हरिभाऊ मंचलवार, प्रवीण झामरे यांनी हजारो गुुंतवणूकदारांची पाच हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केली आहे. गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी मुद्दलही लोकांना मिळालेले नाही. उपरोक्त सर्व संचालकांपैकी काही कारागृहात तर काही फरार आहेत. काहींवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शहरात अनेकजण पाँझी योजना चालवित असून पोलिसांमध्ये तक्रार करण्यात न आल्यामुळे अनेक घोटाळे अजूनही उजेडात आले नाहीत.
लोकांमध्ये जनजागृतीची गरज
पाँझी योजनांपासून दूर राहण्यासाठी लोकांमध्येही जनजागृतीची गरज आहे. देशात मोठ्या कंपन्यांनी केलेले घोटाळे सर्वांना ज्ञात आहेत. राष्ट्रीयकृत वा सहकारी बँका लोकांना गुंतविलेली रक्कम १० वर्षांत दुप्पट देत असेल तर खासगी कंपन्या दोन वा तीन वर्षांत रक्कम दुप्पट कशी देते, याचा खोलात जाऊन विचार करण्याची गुंतवणूकदारांना गरज आहे. आयुष्याची कमाई आकर्षक योजनांमध्ये गुंतवणूक करायची असल्यास आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही महत्त्वाचे ठरते.
लोकांनी बँकांमध्ये ठेवी ठेवाव्यात
राष्ट्रपतींच्या वटहुकूमामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. गुंतवणूकदार पाँझी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी राष्ट्रीयकृत वा सहकारी बँकांमध्ये ठेवी ठेवतील आणि अल्प कालावधीत दुप्पट व तिप्पट रक्कम देणाºया योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापासून वाचतील. छोट्या गुंतवणूकदारांना वटहुकूमामुळे फायदा झाला आहे. वटहुकूमात काही बाबी स्पष्ट नसल्यामुळे व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे. सरकारने त्यात स्पष्टता आणावी.
- सीए अनिल पारख.