आता चक्क होतेय ‘ड्रोन्स’ व विदेशी मद्याची ‘स्मगलिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:36 AM2020-02-17T10:36:24+5:302020-02-17T10:37:59+5:30
पाच वर्षांत नागपूर शहरात चक्क ‘ड्रोन्स’ अन् विदेशी मद्याच्या ‘स्मगलिंग’चा प्रयत्न झाला. माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवाईमार्गाने विदेशातून बेकायदेशीररीत्या विविध वस्तू घेऊन येणाऱ्यांवर केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर विभागाच्या ‘एअर कस्टम्स युनिट’चे बारीक लक्ष असते. सर्वसाधारणत: हवाईमार्गाने सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू जास्त प्रमाणात बेकायदेशीरपणे आणल्या जातात असा समज आहे. परंतु मागील पाच वर्षांत शहरात या वस्तूंसह चक्क ‘ड्रोन्स’ अन् विदेशी मद्याच्या ‘स्मगलिंग’चादेखील प्रयत्न झाला. माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर कार्यालयाकडे विचारणा केली होती. २०१५ पासून कार्यालयाच्या ‘एअर कस्टम्स युनिट’ने अनधिकृतपणे आणण्याचा प्रयत्न येणाºया किती वस्तू पकडल्या, कितीचा मुद्देमाल जप्त झाला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१५ ते जानेवारी २०२० या कालावधीत हवाईमार्गाने चक्क ६७ लाख ६० हजार ०८४ रुपयांच्या बेकायदेशीररीत्या वस्तू आणणात आल्या. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात लॅपटॉप सह ‘ड्रोन्स’, विदेशी मद्य, चांदी, विदेशी चलन, सिगारेट, हर्बल पावडर यांचा प्रामुख्याने समावेश होता. दरम्यान, हवाईमार्गाने अनधिकृतपणे सोने आणण्याचादेखील प्रयत्न झाला. २०१३ ते जानेवारी २०२० या कालावधीत ४ कोटी ९६ लाख ७२ हजार ९६० इतक्या किमतीचे सोने जप्त करण्यात आले.
महिनाभरात ५३ लाखांचे सोने पकडले
२०२० मध्ये जानेवारी महिन्यातच ‘एअर कस्टम्स युनिट’ने विमानतळावर अनधिकृतपणे येणारे १,५६८.८७ ग्रॅम सोन्याचा माल पकडला. माहिती अधिकारातील माहितीनुसार या मालाची किंमत ५३ लाख २१ हजार २५ रुपये इतकी होती.
२०१५ मध्ये पकडले ३ किलो सोने
३० जून २०१५ या एकाच दिवशी सर्वाधिक ३००२ ग्रॅम सोन्याचा माल पकडण्यात आला होता. त्याची किंमत ७४ लाख ६१ हजार २१२ इतकी होती. ५ नोव्हेंबर २०१४ रोजी २,७२३ ग्रॅम तर २३ मार्च २०१४ रोजी १,४८१.६९ सोन्याचा माल जप्त करण्यात आला.