आता मराठीत करा पॉलिटेक्निकचा अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 11:23 AM2021-08-10T11:23:56+5:302021-08-10T11:25:47+5:30
Nagpur News पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थी इंग्रजीसोबतच मराठी भाषेतदेखील पॉलिटेक्निकचा अभ्यास करू शकतील.
आशिष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील आठ वर्षांपासून पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांमध्ये येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांचा निरुत्साह पाहता महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) मोठा निर्णय घेतला आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थी इंग्रजीसोबतच मराठी भाषेतदेखील पॉलिटेक्निकचा अभ्यास करू शकतील.
एमएसबीटीईने सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयातील प्राचार्यांचे मत विचारले होते. सखोल चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक डॉ. मनोज डायगव्हाणे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याअगोदर संपूर्ण अध्ययन सामग्री तयार करण्यात आली आहे. शिक्षकांना आता वर्गात विद्यार्थ्यांच्या माध्यमाच्या अनुषंगाने शिकवावे लागेल. परीक्षेतील प्रश्नपत्रिका इंग्रजीत असेल, परंतु विद्यार्थी इंग्रजी किंवा मराठीत उत्तरे देऊ शकतील.
एआयसीटीईने सर्व प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांना स्थानिक भाषेत शिकविण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाने एमएसबीटीईला प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले होते. मागील दोन वर्षांपासून या दिशेने प्रयत्न सुरू होते, असे डॉ. डायगव्हाणे यांनी सांगितले.
प्रवेश वाढण्याची अपेक्षा
मागील आठ वर्षांपासून पॉलिटेक्निक महाविद्यालयात रिक्त जागांचे प्रमाण वाढले आहे. अगदी ३५ टक्के गुण मिळाल्यावरदेखील प्रवेश मिळू शकत असतानादेखील विद्यार्थी प्रवेशासाठी समोर येत नसल्याचे चित्र आहे. अभ्यासक्रम इंग्रजीत असल्याने मराठी माध्यमातील विद्यार्थी अभ्यासक्रमात प्रवेश घेत नाहीत. आता मराठीचा पर्याय आल्याने यंदा प्रवेश वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.