नागपुरात एनआरआय दाम्पत्याची ५५ लाखाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:02 AM2018-12-13T00:02:03+5:302018-12-13T00:03:18+5:30

सायबर गुन्हेगारांनी एका एनआरआय दाम्पत्यास ५५ लाखाचा चुना लावला. तीन महिन्यानंतर या घटनेचा खुलासा झाल्यानंतर एनआरआय दाम्पत्याने धावपळ केली. बँकेच्या चुकीमुळे ही घटना घडल्याने त्यांना गमावलेले पैसे परत मिळाले.

NRI couple cheated by Rs 55 lakh in Nagpur | नागपुरात एनआरआय दाम्पत्याची ५५ लाखाने फसवणूक

नागपुरात एनआरआय दाम्पत्याची ५५ लाखाने फसवणूक

Next
ठळक मुद्देसायबर गुन्हेगारांचे कृत्य : बँकेने परत केली रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सायबर गुन्हेगारांनी एका एनआरआय दाम्पत्यास ५५ लाखाचा चुना लावला. तीन महिन्यानंतर या घटनेचा खुलासा झाल्यानंतर एनआरआय दाम्पत्याने धावपळ केली. बँकेच्या चुकीमुळे ही घटना घडल्याने त्यांना गमावलेले पैसे परत मिळाले.
मीनाक्षी प्रसाद आणि त्यांची पत्नी विजया प्रसाद हे अमेरिकेत राहतात. ते मूळचे नागपूरचे आहेत. ते अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांना अनिवासी भारतीय (एनआरआय)चा दर्जा मिळालेला आहे. प्रसाद दाम्पत्याचे किंग्सवे येथील आयसीआयसीआय बँकेत एनआरआय खाते आहे. फसवणुकीची घटना जुलै महिन्यातील आहे. अज्ञात आरोपींनी चेकने प्रसाद दाम्पत्याच्या खात्यातून ५५ लाख रुपये लंपास केले. ही रक्कम प्रसाद दाम्पत्याच्या मुंबई येथील उमंग ट्रेडर्सच्या खात्यातून ट्रान्सफर झाली. त्यानंतर ती काढण्यात आली. प्रसाद दाम्पत्य वर्षभरापासून भारतात आलेच नाही. त्यांना बँकेकडून पैसे काढण्यात आल्याचा कुठलाही एसएमएस आला नाही. यामुळे त्यांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याबाबत माहितीच मिळाली नाही. आॅक्टोबर महिन्यात इ-स्टेटमेंट तपासले असता ही बाब लक्षात आली. प्रसाद दाम्पत्यांनी बँकेशी संपर्क केला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चेकद्वारे पैसे काढण्यात आल्याचे सांगितले. तेव्हा प्रसाद यांना धक्का बसला.त्यांनी अधिकाºयांना सांगितले की, ते एक वर्षापासून भारतात आलेच नाही. तसेच त्यांनी बँकेकडून चेकबुक सुद्धा घेतले नसल्याचेही स्पष्ट केले.
सूत्रानुसार बँकेने माहिती काढली असता प्रसाद दाम्पत्यांनी केलेला दावा खरा आढळून आला. प्रसाद दाम्पत्यांनी चेकबुकसाठी कुठलाही अर्ज केला नव्हता. ही रक्कम त्यांना वडिलोपार्जित संपत्तीच्या विक्रीतून मिळालेली होती.
या दरम्यान प्रसाद दाम्पत्याने ई-मेल आणि कुरियरने शहर पोलिसांच्या सायबर सेलला तक्रार केली. सायबर सेलचे पीएसआय बलराम झाडोकर यांनी तपास सुरु केला. पोलिसांना विचारपूस दरम्यान ही रक्कम मुंबईतील उमंग ट्रेडर्सच्या खात्यातून काढण्यात आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बँकेला प्रसाद दाम्पत्यास चेकबुक प्रदान केल्याचे दस्तावेज मगितले. तेव्हापर्यंत ग्राहकाची कुठलही चूक नसल्याचे बँकेच्याही लक्षात आले होते. बँकेने प्रसाद दाम्पत्यास ५५ लाख रुपये परत केले. प्रसाद दाम्पत्याने या सहकार्याबाबत सायबर सेलचे आभार मानले.
बँकेतील व्यक्तीवर संशय
या प्रकरणात पोलिसांना बँकेशी जुळलेल्या व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय आहे. या प्रकारची फसवणूक जाणकार व्यक्तीच करू शकते. रक्कम परत मिळाल्याने प्रसाद दाम्पत्य तक्रार करण्यास इच्छुक नाही तर बँकेनेही या दिशेने अद्याप कुठलेही पाऊल उचलले नाही.
नियमाचा ग्राहकाला लाभ
ग्राहकाची कुठलीही चूक नसताना त्याच्या खात्यातून पैसे काढण्यात आले असेल तर अशा परिस्थितीत बँकेला नुकसान भरपाई द्यावी लागते. यासाठी ग्राहकाला तीन दिवसाच्या आत तक्रार दाखल करावी लागते. ग्राहकाला लगेच डिस्प्युट डिक्लेरेशन फार्म भरावा लागतो.
चहा व्यापाऱ्यास तीन लाखाचा चुना
चहा व्यापाऱ्याची तीन लाखाने फसवणूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध शांतिनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनोद सव्वालाखे व योगेंद्र सव्वालाखे रा. कावरापेठ अशी आरोपीची नावे आहे.
वाठोडा येथील रहिवासी जयकिशन शर्मा यांचे कावरापेठ येथे आकाश सेल्स कॉर्पोरेशन आहे. आरोपींनी शर्मा यांच्याशी ३ लाख १६ हजार रुपये किमतीचा २०२४ किलो चहा खरेदी केला. आरोपींनी हा चहा दुसऱ्या व्यापाऱ्याला विकून मिळालेली रक्कम परस्पर लंपास केली. शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
बंद घरातून दोन लाख रुपये उडवले
कळमना येथील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये चोरले. न्यू ओमसाईनगर येथील मो. यासिन युनुस लंघा हे २ डिसेंबर रोजी कुटुंबासह गुजरातला गेले होते. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आलमारीत ठेवलेले पैसे चोरून नेले. मंगळवारी ते परत आले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बाईकवर बसवून महिलेचा विनयभंग
एका महिलेचा पाठलाग करून तिला आपल्या बाईकवर बसवून विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हितेश भैसारे (३२ ) अंगुलीमालनगर इंदोरा असे आरोपीचे नाव अहे. आरोपी हितेशने मंगळवारी गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेचा पाठलाग केला. तिला आपल्या बाईकवर बसवून तिचा विनयभंग केला. महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
युवा अभियंत्याने केली आत्महत्या
जरीपटका येथे एका युवा अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गौतम विजय तिवारी (२६) रा. रमाईनगर जरीपटका, असे मृताचे नाव आहे. गौरवने नुकताच अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्याचे वडील पोलीस विभागात कार्यरत आहेत. गौरवने मंगळवारी दुपारी गळफास घेतला. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

Web Title: NRI couple cheated by Rs 55 lakh in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.