कोरोना रुग्णसंख्येची २ हजाराकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:09 AM2021-03-10T04:09:45+5:302021-03-10T04:09:45+5:30

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. मंगळवारी १३३८ नव्या रुग्णांची भर पडली तर, ६ रुग्णांचे जीव गेले. कोरोना ...

The number of corona patients is approaching 2,000 | कोरोना रुग्णसंख्येची २ हजाराकडे वाटचाल

कोरोना रुग्णसंख्येची २ हजाराकडे वाटचाल

Next

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. मंगळवारी १३३८ नव्या रुग्णांची भर पडली तर, ६ रुग्णांचे जीव गेले. कोरोना प्रतिबंधक नियमांचे कठोरतेने पालन न झाल्यास दैनंदिन रुग्णसंख्या २ हजारापर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवीत आहेत. उपराजधानीत रुग्णांची एकूण संख्या १,६०,३४३ तर मृतांची संख्या ४,४०७ झाली आहे. आज चाचण्यांची संख्या वाढून १० हजारावर गेली. रुग्णसंख्या वाढत असताना सक्रिय रुग्णांची संख्या ११,४११ झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

नागपूर जिल्ह्यात ११ मार्च रोजी कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत असताना, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढायला लागली. यामुळे संकट टळले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आज ७,८२१ आरटीपीसीआर तर २,६५५ रॅपीड अँटिजेन अशा एकूण १०,४७६ कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या. आरटीपीसीआरमधून ११६० तर अँटिजेनमधून १७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधितांमधून ९९७ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत १,४४,५२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याचा दर ९०.१३ टक्के आहे.

- शहरात १०४९ तर ग्रामीणमध्ये २८६ रुग्ण पॉझिटिव्ह

नागपूर जिल्ह्यात आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १०४९, ग्रामीणमधील २८६ तर जिल्हाबाहेरील ३ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील १, ग्रामीणमधील २ तर जिल्हाबाहेरील ३ मृत्यू आहेत. शहरात आतापर्यंत १,२७,९२८ रुग्ण व २,८३८ मृत्यू तर ग्रामीणमध्ये ३१,४४८ रुग्ण व ७८४ मृत्यूची नोंद झाली. ग्रामीणच्या तुलनेत शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे.

- खासगी रुग्णालयातील कोविड रुग्णांचा भार मेयो, मेडिकलवर

नागपुरात कोरोनाबाधितांवर उपचार करणारे ९१ हॉस्पिटल आहेत. यातील पाच शासकीय तर उर्वरित खासगी हॉस्पिटल आहेत. बहुसंख्य हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागासह व्हेंटिलेटर व इतर सोयी आहेत. असे असताना खासगी हॉस्पिटलकडून कोरोनाच्या गंभीर रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये पाठविले जात आहे. मंगळवारी खासगी हॉस्पिटलमधून ११ कोरोना रुग्णांना मेयोला पाठविले. यामुळे शासकीय रुग्णालयांवर रुग्णांचा भार वाढला आहे. सध्या मेयोमध्ये १४५ रुग्ण उपचार घेत आहेत.

- मेडिकलचे अतिदक्षता विभाग फुल्ल

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मेडिकलमधील १२० खाटांचा अतिदक्षता विभाग अग्निशमन यंत्रणा नसल्याच्या कारणावरून बंद ठेवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, मेडिकलमध्ये सध्याच्या स्थितीत प्रत्येकी २५ खाटांचे ३ आयसीयू आहेत. येथील सर्वच खाटा फुल्ल झाल्या आहेत. यामुळे मंगळवारी गंभीर रुग्णांना मेयोत पाठविण्याची वेळ मेडिकल प्रशासनावर आली.

दैनिक चाचण्या :१०४७६

एकूण बाधित : १६०३४३

बरे झालेले रुग्ण : १४४५२५

सक्रिय रुग्ण : ११४११

एकूण मृत्यू :४४०७

Web Title: The number of corona patients is approaching 2,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.