लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सणोत्सव, परंपरा या उत्साहाला उधाण देणारे आणि सकारात्मक ऊर्जा प्रशस्त करणारे असतात. त्याचा प्रत्यय अनेकदा येतो आणि मकरसंक्रांत उत्सव त्यातला एक आहे. तीळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणत शेजारपाजारचे संबंध अधिक दृढ करण्याचे हे पर्व गुरुवारी जल्लोषात साजरे झाले. या जल्लोषाला जोड होती ती लहानमोठ्यांच्या पतंगोत्सवाची. आता हा उत्सव पूर्वीसारखा घरोघरी साजरा होत नसला तरी त्यातला जल्लोष जराही कमी झालेला नाही. गुरुवारी सूर्योदयापासूनच पतंगबाजांच्या रस्सीखेचीला प्रारंभ झाला आणि आसमंतात बहुरंगी, बहुढंगी पतंगांच्या थव्यासोबतच ‘ओ काट’चा गजर निनादत होता.
संक्रांतीला पतंगांचा खरा जल्लोष जुन्या नागपुरात अर्थात महाल, इतवारी, नंदनवन, रेशीमबाग या भागात होत असतो. मात्र, जसजसा नागपूरचा विस्तार चहूबाजूने होत गेला तसतसा हा जल्लोष विस्तीर्ण होत गेला. गुरुवारी पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण आणि मध्य नागपुरात हा जल्लोष दिसून आला. पतंग उडविणाऱ्या म्होरक्यासोबत मांजाने गुंफलेली चक्री पकडणारा सारथी, अशी ही जोडी एकमेकांना प्रतिस्पर्धीच्या पतंगांचा वेध घेण्यास खुणावत होती. जमिनीवरील माईंड गेम आसमंतात पतंगाच्या तुंबड युद्धाला आमंत्रण देत होता. ‘ढिल दे ढिल दे दे रे भैया, ऊस पतंग को काट दे’ असे म्हणत प्रतिस्पर्ध्याशी पेच लढवली जात होती आणि क्षणार्धात ‘ओ काट’चा गजर होत होता. हा कौशल्यपूर्ण नजारा सुखावणारा होता आणि त्याचे दर्शन सर्वत्र दिसून येत होते. मात्र, यासोबतच रस्त्यांवरून गुजराण करणाऱ्यांच्या मनात प्रचंड धास्तीही वाढल्याचे दिसून येत होते. कापलेल्या पतंगाला पकडण्यासाठी मुले रस्तोरस्ती पळत होती. अनेक वाहनचालकांना मांजाने अडवले, अनेकांचे गळे कापले गेले. काही प्रसंगी दैव बलवत्तर म्हणून वाचले तर काही ठिकाणी माणसे जखमीही झाली. काही ठिकाणचे नागरिकच स्वयंस्फूर्ततेने वाहनचालकांना सावध करत होते.
घराबाहेर पतंगोत्सवाला उधाण आले होते, तर घरादारात तीळगुळाच्या गोडव्याला प्रारंभ झाला होता. गृहिणी दरसालाप्रमाणे सकाळपासूनच पूजाविधी आणि त्यानंतर तीळगुड, लाडू, चिवडा बनविण्यात व्यस्त झाल्या होत्या. पतंग उडवून झाल्यावर मधल्या उसंतीत घरातील लहान-थोर या गोडव्याचा आणि चटकदार चिवड्याचा आनंद घेत असतानाचे चित्र घरोघरी होते.
पतंगाला धागा नायलॉनच, मग कारवाई कुणावर?
नायलॉन मांजाने झालेले भयंकर अपघात आणि त्या अपघातात गेलेल्या जिवाची घटना ताजी असताना, प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन दिले जात आहे. मात्र, गुरुवारी सर्वत्र नायलॉन मांजाचाच वापर होत असल्याचे आढळून येत होते. दुकानदारांनी थाटलेल्या दुकानात नायलॉन दिसत नसला तरी पतंग उडविणाऱ्यांच्या हातात मात्र हा मांजा दिसत होता. साधा मांजा दुरापास्तच. अशा स्थितीत प्रशासनाने कारवाई नेमकी कुणावर केली, हा प्रश्न उपिस्थत होणारा आहे.
पोलिसांची जागोजागी टेहळणी
दोनच दिवसांपूर्वी झालेल्या नायलॉन मांजाच्या अपघातात एका युवकाचा जीव गेला. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांची शहरात जागोजागी तैनाती होती. अनेकांना वाहन हळू चालविण्याचे आवाहन केले जात होते. प्रसंगी पोलीस नागरिकांना मदतही करत असल्याचे दिसून येत होते.
उड्डाणपुलांवरील वाहतूक बंद
पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. उड्डाणपुलावरून जाताना मांजाचा धोका अधिक असल्याने ही व्यवस्था करण्यात आली होती.
लोंबलेले मांजे आणि विहार करणारे पतंग
विद्युत तारा, वृक्ष, केबल वायर्सना जागोजागी कटलेल्या पतंगांचे मांजे लोंबकळत होते आणि त्यांच्या मुखाला पतंग स्वच्छंद विहार करत होते. काही ठिकाणी नागरिक स्वत:च ते दूर करण्याचे प्रयत्न करत होते. मात्र, अनेक ठिकाणी वाहतूक करणाऱ्यांना त्याचा अडकाव होत होता.
युवकाचा कापला गळा, सुदैवाने वाचला
नायलॉन मांजाच्या अपघाताच्या अनेक घटना ताज्याच असताना गुरुवारीही एका युवकाचा या मांजाने गळा कापला गेला. मानेवाडा रोडवर अंकित नेरकर हा २४ वर्षीय युवक आपल्या जॉबवर जात असताना हा अपघात घडला. वाहनाची गती कमी असल्याने नायलॉन मांजाची जखम खोलवर नव्हती. त्याच वेळी त्याच्या मागून येणाऱ्या कारचालकानेही संयम दाखविल्याने, त्याचे प्राण वाचले.