नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील उद्दिष्ट कठीणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 10:49 AM2019-12-26T10:49:42+5:302019-12-26T10:52:26+5:30

नागपूर : राज्यातील सत्तांतरामुळे नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष अनुदानाची फारशी अपेक्षा नाही. याचा विचार करता अर्थसंकल्पातील उद्दिष्ट गाठणे अवघड आहे.

The objectives of the Nagpur municipal budget are difficult | नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील उद्दिष्ट कठीणच

नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील उद्दिष्ट कठीणच

Next
ठळक मुद्देविकास निधीत २५ ते ३० टक्के कपात मनपा आयुक्तांचा अर्थसंकल्प जानेवारीनंतर

गणेश हूड।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेचा सन २०१९-२० या वर्षाचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी मांडला होता. यात सुुरुवातीची शिल्लक ३९९.८७ कोटींची गृहीत धरून वित्त वर्षात २७९७.७३ कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. आता तीन महिने शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत मालमत्ता व नगररचना विभागाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. पण राज्यातील सत्तांतरामुळे विशेष अनुदानाची फारशी अपेक्षा नाही. याचा विचार करता अर्थसंकल्पातील उद्दिष्ट गाठणे अवघड आहे. आयुक्त जानेवारी अखेरीस सुधारित व प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष व आयुक्त यांच्या अर्थसंकलपात ७०० कोटींची तफावत राहण्याची शक्यता आहे. अर्थातच आयुक्तांचा सुधारित अर्थसंकल्प विचारात घेता मंजूर विकास कामांच्या निधीत २५ ते ३० टक्के कपात करावी लागणार आहे.
आयुक्तांचा २०१८-१९ या वर्षाचा सुधारित अर्थसंकल्प २४३४.३६ कोटींचा होता. २०१९-२० या वर्षाचा सुधारित अर्थसंकल्प २४९० कोटींच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. निजोरीत जमा होणारा महसूल विचारात घेता स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात २५ ते ३० टक्के कपात करावी लागणार आहे. काही नगरसेवकांना याची चाहूल लागल्याने आपल्या प्रभागातील विकास कामांना तातडीने सुरुवात करण्याच्या प्रयत्नात आहेत.
राज्यात भाजपची सत्ता असल्याने २०१८-१९ या वर्षात महापालिकेच्या एकूण उत्पन्नाच्या ७६ टक्के महसूल हा शासकीय अनुदानातून प्राप्त झाला होता. जीएसटी अनुदानातून ८६९ कोटी प्राप्त झाले होते. विशेष अनुदान स्वरुपात १५० कोटी तसेच मलेरिया व फायलेरिया विभाग व शिक्षण विभागाची ३६ कोटींची थकबाकी मिळाली होती. महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागाच्या विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला होता. यामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला होता. वास्तविक मालमत्ताकरापासून ५०९ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असताना प्रत्यक्षात २२८ कोटी जमा झाले होते. २०१९-२० या वर्षात मालमत्ता करापासून ४४३.७० कोटी अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मालमत्ताकराची वसुली ३०० कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मालमत्ता कराच्या वसुलीत ७० ते ७५ कोटींची वाढ होण्याची अपेक्षा आहे. भूखंड नियमितीकरण नासुप्रकडून महापालिकेकडे आल्याने नगर रचना विभागाच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत २० ते २५ कोटींची वाढ अपेक्षित आहे. बाजार विभागाचे उत्पन्नही काही प्रमाणात वाढणार आहे. गेल्या वर्षींच्या तुलनेत जीएसटी अनुदान वाढले आहे. असे असले तरी अर्थसंकल्पातील उद्दिष्ट अवघड आहे.
सुधारित अर्थसंकल्पाची तयारी सुरू
महापालिकेचा सन २०१९-२० या वर्षाचा सुधारित तर २०२०-२१ या वर्षाच्या प्रस्तावित अर्थसंकल्पाची तयारी करण्याचे निर्देश वित्त व लेखा विभागाला दिले आहेत. वित्त वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत मालमत्ता, नगर रचना व बाजार विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. आणखी तीन महिने शिल्लक आहेत. या कालावधीत कर वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश विभागांना दिले आहे.
- अभिजित बांगर, आयुक्त महापालिका

Web Title: The objectives of the Nagpur municipal budget are difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.