नागपुरात दोन वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 01:01 AM2020-07-22T01:01:28+5:302020-07-22T01:02:36+5:30
दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजारच्या मुलाने अश्लील चाळे केल्याचा आरोप झाल्याने जरीपटक्यात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित मुलीचे पालक आणि त्यांचे सहकारी तसेच हे कृत्य करणाऱ्याचे नातेवाईक आणि सहकारी अशी दोन्हीकडील मंडळी आरोप-प्रत्यारोप करीत असल्यामुळे जरीपटका ठाण्यातील वातावरण आज दिवसभर गरम होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजारच्या मुलाने अश्लील चाळे केल्याचा आरोप झाल्याने जरीपटक्यात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित मुलीचे पालक आणि त्यांचे सहकारी तसेच हे कृत्य करणाऱ्याचे नातेवाईक आणि सहकारी अशी दोन्हीकडील मंडळी आरोप-प्रत्यारोप करीत असल्यामुळे जरीपटका ठाण्यातील वातावरण आज दिवसभर गरम होते.
सकाळी ११.३० च्या सुमारास पीडित चिमुकली घाबरलेल्या अवस्थेत तिच्या (वरच्या माळ्यावर) घरी गेली. खाली राहणारा दादा नको तसे प्रकार करीत असल्याचे आईला तिने सांगितले. ते ऐकून संतापलेल्या आईवडिलांनी शेजाऱ्यांना बोलावले. त्यांनी खाली राहणाऱ्या मुलाची आणि त्याच्या नातेवाईकांची कानउघाडणी केली. मुलाने आणि त्याच्या आईवडिलांनी आरोप फेटाळून लावत वाद घातला. त्यामुळे प्रकरण चिघळले. आजूबाजूची मंडळी गोळा झाली. कुणीच माघार घ्यायला तयार नसल्याने प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे पीडित मुलीच्या पालकांनी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप होत असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात तटस्थ भूमिका घेतली. यामुळे ठाण्यातील वातावरण अधिकच गरम झाले. यासंबंधाने जरीपटक्याचे ठाणेदार खुशाल तिजारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुलगा १६ वर्षांपेक्षा कमी वयाचा असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होत नसल्याचे सांगितले. हे प्रकरण बाल संरक्षण समितीकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही दिली. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे पीडित मुलीच्या पालकांनी आणि शेजाऱ्यांनी आरोप लावून संताप व्यक्त केला आहे.