निमित्त : संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:19 AM2018-11-04T00:19:41+5:302018-11-04T00:23:54+5:30
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकडे सगळ्या साहित्य प्रेमींचे डोळे लागलेले असतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुका महामंडळाने यावर्षापासून बंद केल्या आणि पहिल्याच वर्षी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड अध्यक्षपदासाठी करून आजवर संमेलनाध्यक्ष पदाला लागलेल्या टीकेच्या गालबोटावरून लिंबलोण उतरून टाकलं आहे हे नक्की !
ज्येष्ठ इतिहास संशोधक, लोकसंस्कृतीचे उपासक रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या सुकन्या डॉ. अरुणा ढेरे यांनी वडिलांचा वारसा अतिशय समर्थपणे जपला आहे. त्यांनी आजवर कथा, कविता, कादंबरी, ललितबंध, संशोधन, संपादन, लोकसाहित्य, चरित्रलेखन असे अनेक प्रकार लीलया हाताळले असले तरी त्यांची ठळक ओळख आहे ती कवयित्री म्हणूनच! पद्मा गोळे, शांता शेळके, इंदिरा संत या कवयित्रींच्या पुढच्या काळाची कविता अतिशय ताकदीने लिहिली ती अरुणा ढेरे यांनी! मात्र तरी ती आपल्या पूर्वसुरींचा प्रभाव मिरवणारी नाही तर त्यांची स्वत:ची स्वतंत्र वाट चोखाळणारी ठरली. अरुणा ढेरे यांचं ललितलेखन ज्याप्रमाणे अगदी समोरासमोर बसून जिव्हाळ्याच्या गप्पा केल्यासारखं सहज आणि सुंदर आहे त्याचप्रमाणे त्यांची कविता आहे. एखाद्या मनस्विनीने कॅनव्हासवर आपल्याच तंद्रीत कुंचला चालवावा किंवा आषाढातल्या मध्यरात्री तानपुऱ्यावर एखादी तीव्रोत्कट बंदिश गावी तशी कविता. त्या भरजरी कवितेला, तापलेल्या सतारीच्या तारेने नकळत बोट कापावं तसा दुखून सुखावल्याचा तलम पोत आहे. तिच्यात उपजत समजूत आहे. नख लावणं नाही, विखार नाही, बोचकारणं नाही. आकांत आहे पण कर्कश्शपणा नाही. मात्र स्पष्ट भूमिका आहे. सूक्ष्म निरीक्षण आहे.
शोक करावा साऱ्यांनी असा नसतो प्रसंग
फक्त आतल्या सुखाचा एक श्वास कमी होतो ...
ही अतिशय संवेदनशील अभिव्यक्ती आहे.
माझ्या मित्रा, अनय, शैशवतारा, मायबाई या कवितेतून मानवी नातेसंबंधांवरचा त्यांचा विश्वास वारंवार दिसतो आणि कवितेतून त्यातल्या सौन्दर्यासह वाचकापुढे येऊन उभं रहातं.
हसतो आपण मनातल्या मनात
मनातल्या मनात आपल्याला शोधून दमलेल्या
जगातल्या शहाण्या पुरुषाला
अन आपल्याला तसलं हसता येतं हेही तो जाणत नाही
मनात आणलंच तर
जग हसून पेटवू शकतो आपण
पण तसलं काही आपण मनातही आणत नाही !
आपण किती ओळखतो एकमेकींना ?
ही कॅथार्सिसची अनुभूती देणारी कविताही त्यांचीच. म्हणूनच कदाचित वाचकाला ती आपली, स्वत:ची वाटू लागते. शब्द या अभिव्यक्ती माध्यमावर कमालीचा जीव आहे त्यांचा आणि त्या शब्दाबद्दल एक कुतूहल देखील त्यांच्यापाशी आहे. म्हणूनच मंत्राक्षर या कवितासंग्रहात एक स्वतंत्र विभागाच या कवितांचा आहे. कलावंताला शब्द कसा भेटतो? त्यांची अनेक रूपं त्यात सापडतील.
सांप्रतच्या काळात इतक्या ताकदीच्या कवयित्रीने अध्यक्षपदावर विराजमान व्हावं ही खरंच काळाची गरज होती. कविता सोपी नाही. ती समाज माध्यमांवर टिचकी मारावी तितकी सहज साध्य नाही हे कळायला हवं आहे नव्याने लिहिणाऱ्यांना!
अरुणा ढेरे तर स्पष्ट म्हणतातच
चूड प्राणांची लावून कर आयुष्याची होळी
तेव्हा कुठे जुळतील दोन कवितेच्या ओळी !
माधवी भट