परीक्षेच्या अगोदर जप्त होतील अधिकाऱ्यांचे मोबाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:32 PM2019-02-13T23:32:55+5:302019-02-13T23:33:47+5:30
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने परीक्षेच्या अगोदर व परीक्षेच्या कालावधीत केंद्र अधिकाऱ्यांना मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई केली आहे. केंद्रात येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन जप्त करण्याचे निर्देश केंद्र संचालकांना देण्यात आले आहेत. उत्तरपत्रिका ‘कस्टडी सेंटर’मध्ये गेल्यानंतरच फोन वापस करण्यात येणार आहेत. केवळ संचालकांनाच फोन बाळगण्याची परवानगी असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने परीक्षेच्या अगोदर व परीक्षेच्या कालावधीत केंद्र अधिकाऱ्यांना मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई केली आहे. केंद्रात येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन जप्त करण्याचे निर्देश केंद्र संचालकांना देण्यात आले आहेत. उत्तरपत्रिका ‘कस्टडी सेंटर’मध्ये गेल्यानंतरच फोन वापस करण्यात येणार आहेत. केवळ संचालकांनाच फोन बाळगण्याची परवानगी असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होत आहेत. यानिमित्त विभागीय अधिकाऱ्यांनी विभागातील सर्व परीक्षा केंद्र संचालकांची बैठक बोलविली होती. या बैठकीत त्यांना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय पावले उचलायची आहे, याची माहिती देण्यात आली. परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रात कुठलेही ‘इलेक्ट्रॉनिक’ यंत्र नेण्याची परवानगी नाही, असे मंडळाच्या विभागीय सहसचिव माधुरी सावरकर यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारावर परीक्षार्थ्यांची कडेकोट तपासणी करण्यात येईल. जर विद्यार्थ्याकडे असे यंत्र सापडले तर ते जप्त करण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागात ‘लोडशेडिंग’ची स्थिती पाहता परीक्षा सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर सर्व केंद्र संचालकांनी महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासदेखील सांगण्यात आले आहे.
‘होमगार्ड’ नव्हे पोलीस कर्मचारी तैनात करा
परीक्षेदरम्यान केंद्रांवर प्रश्नपत्रिकांची सुरक्षा व परीक्षेदरम्यान शांती कायम रहावी यासाठी मंडळाचे विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी परीक्षा केंद्रांवर ‘होमगार्ड’ऐवजी पोलीस कर्मचारी तैनात करण्याची विनंती पोलिसांना केली आहे.