नागपूर : भाजपा पदाधिकारी सना खान यांची हत्या झाल्याची चर्चा सुरू होण्यापूर्वीच, ३ ऑगस्टला काही जणांना अश्लिल फोटो आणि व्हिडीओ पाठविण्यात आले होते, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, सना खान बेपत्ता असताना त्यांच्याच नावाने असलेल्या सीम कार्डच्या माध्यमातून हे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ पाठविण्यात आल्याची खास सूत्रांची माहिती आहे.
दोन राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित सना खान हत्याकांडात मुख्य आरोपी अमित उर्फ पप्पू साहू याने गुन्ह्याची कबुली दिली असली तरी अनेक बाबींचा खुलासा करण्याचे टाळले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी सना खानशी संबंधित असलेल्या डझनभर संशयीतांची चाैकशी केली. त्यातील काही जणांकडून पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळाली.
२ ऑगस्टच्या सकाळपासून सना बेपत्ता झाली आणि तिचे फोनही बंद असले तरी ३ ऑगस्ट (मिसिंग कम्प्लेंट)पर्यंत मानकापूर पोलीस आणि सनाच्या कुटुंबियांव्यतिरिक्त निवडक निकटस्थ सोडले तर फारशी कुणाला ही माहिती नव्हती. ईकडे मिसिंगची तक्रार दाखल होत नाही तोच सनाच्या नावे असलेल्या सिमच्या माध्यमातून ५० ते ६० अश्लिल फोटो आणि व्हिडीओ काही जणांकडे व्हायरल झाले. ५ ऑगस्टला सनाची हत्या झाल्याचा संशय घेणे सुरू झाले. ७ ऑगस्टला सनाची हत्या झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले. मात्र त्यापूर्वीच हे एवढ्या मोठया प्रमाणात फोटो आणि व्हिडीओ कुणी आणि कोणत्या उद्देशाने व्हायरल केले, ते अद्याप उघड झाले नाही.
विशेष म्हणजे, ही बाब अजूनही उघडपणे सांगितली गेली नाही किंवा चर्चेलाही आली नाही. पप्पू साहू आणि साथीदारांना अटक करून पोलिसांनी नागपुरात आणल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून अजून काही नावे पुढे आली. त्यामुळे पोलिसांनी सनाच्या नागपूर येथील तर पप्पूच्या जबलपुरातील डझनभर निकटस्थतांची दोन ते तीन दिवस सलग चौकशी केली. त्यानंतर ३ आणि ६ ऑगस्टला फोटो आणि अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याची बाब पुढे आली.
'प्रकरण नाजूक वळणावर'
ही बाब पोलिसांनी अद्याप 'अधिकृतपणे' उघड केलेली नाही. या संबंधाने पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्याकडे विचारणा केली असता 'प्रकरण नाजूक वळणावर' आहे. त्यामुळे या संबंधाने सध्या बोलणे योग्य नाही', असे ते म्हणाले.