लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गर्भाशयाचा कर्करोग स्त्रियांमध्ये सर्वसामान्यपणे आढळणारा आजार आहे. ‘पॅपस्मियर्स’ आणि ‘एचपीव्ही’ (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) या नियमित चाचण्यांच्या मदतीने या आजाराची तपासणी करता येते. या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी १४ वर्षांवरील मुला-मुलींना लस देणे हा एक चांगला पर्याय आहे. या शिवाय स्तनाच्या कर्करोगामध्ये स्वत:हून तपासणी करून निदान करणे हा एक चांगला पर्याय असतानाही दुर्लक्ष, अज्ञान व लाजेमुळे स्त्रिया कर्करोगाला गंभीरतेने घेत नाही. भारतात २०१५ मध्ये केवळ स्तनाच्या कर्करोगाचे १ लाख ५५ हजार नवे रुग्ण आढळून आले तर यातील ७६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी, असे आवाहन वरिष्ठ मेडिकल आॅन्कोलॉजिस्ट डॉ. सुशील मानधनिया यांनी केले.८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत डॉ. मानधनिया यांनी कर्करोगाला दूर ठेवण्यासाठी महिलांमध्ये जनजागृती व लवकर निदान यावर भर दिला. स्तनाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये सर्वात सामान्य आहे. दरदिवशी या कर्करोगाचे २०० नवे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे योग्य जीवनशैली व जनुकीय घटकांबद्दल अधिक जागृत राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.यांना कर्करोगाचा धोका अधिकडॉ. मानधनिया म्हणाले, स्तनाच्या कर्करोगाला कौटुंबिक इतिहास असतो. आपल्या निकटच्या नातेवाईकाला झाला असल्यास त्याच्याकडून तो पसरण्याची भीती असते. महिलांचे वय वाढते तसा धोकाही वाढतो. वयाच्या १२ व्या वर्षाच्या आधी मासिक पाळी सुरू होणे, वयाच्या ५० वर्षानंतर रजोनिवृत्ती संपणे, मूल झालेले नसणे तसेच मद्यपान, अधिक चरबीयुक्त आहार, चोथायुक्त अधिक आहार, धूम्रपान, लठ्ठपणा आणि आधी गर्भाशयाचा किंवा कोलोनचा कर्करोग झालेला असणे, अशा महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा अधिक धोका असतो.एक लाख लोकसंख्येत स्तनाच्या कर्करोगाचे २५.८ रुग्णडॉ. मानधनिया म्हणाले, भारतात एक लाख लोकसंख्येमध्ये २५.८ रुग्ण हे स्तनाच्या कर्करोगाचे आढळून येतात. तर याच लोकसंख्येमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामध्ये २०.२ रुग्ण, आतड्यांच्या कर्करोगामध्ये ४.५ तर अंडाशयाचा व कोलोनचा कर्करोगामध्ये ४.५ रुग्ण आढळून येतात. पहिल्या टप्प्यातच कर्करोगाचे निदान झाल्यास उपचाराचा यशाचा टक्का ९० असतो तर तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात निदान झाल्यास हा टक्का १०वर येतो.
२०१५ मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे दीड लाखांवर रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 8:15 PM
भारतात २०१५ मध्ये केवळ स्तनाच्या कर्करोगाचे १ लाख ५५ हजार नवे रुग्ण आढळून आले तर यातील ७६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी, असे आवाहन वरिष्ठ मेडिकल आॅन्कोलॉजिस्ट डॉ. सुशील मानधनिया यांनी केले.
ठळक मुद्देडॉ. सुशील मानधनिया : आजार बळावण्यासाठी दुर्लक्ष, अज्ञान व लाज ठरतेय कारण