विदर्भात कोरोनाचे एक लाख रुग्ण; १८८ दिवसात गाठला रुग्णसंख्येचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 10:28 AM2020-09-16T10:28:36+5:302020-09-16T10:28:54+5:30
ऑगस्ट महिन्यात तब्बल ४४५९८ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या ५४,९२१ झाली. गेल्या १५ दिवसात ४७,५५० रुग्णांची वाढ झाल्याने ही रुग्णसंख्या आत १०२४७१ वर गेली आहे
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला आहे. १८८ दिवसात एक लाख रुग्णांचा टप्पा गाठला आहे. मंगळवारी एकूण रुग्णांची संख्या १०२४७१वर पोहचली. विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यात ४४५९८ रुग्णांची नोंद झाली असताना मागील १५ दिवसातच ४७,५५० नव्या रुग्णांची भर पडली. विदर्भात, पहिले १० हजार रुग्ण गाठायला १३३ दिवसाचा कालावधी लागला होता, परंतु १० सप्टेंबरपासून सलग तीन दिवसानी १० हजार रुग्णांची भर पडत आहे. आतापर्यंत सर्वाधिक रुग्णांची नोंद नागपूर जिल्ह्यात तर सर्वात कमी रुग्णांची नोंद वर्धा जिल्ह्यात झाली आहे. लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल होत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. विदर्भात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. या महिन्यात के वळ २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. एप्रिल महिन्यात २९४ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ३६५ झाली. मे महिन्यात १३६२ रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णसंख्या १७२७ झाली. जून महिन्यात २७९९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ४५२६ झाली. जुलै महिन्यात १०३२३ रुग्णांंची वाढ झाल्याने रुग्णसंख्या १४८४९ वर पोहचली. ऑगस्ट महिन्यात तब्बल ४४५९८ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या ५४,९२१ झाली. गेल्या १५ दिवसात ४७,५५० रुग्णांची वाढ झाल्याने ही रुग्णसंख्या आत १०२४७१ वर गेली आहे
पहिले १० हजार रुग्ण गाठायला लागले १३३ दिवस
कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद ११ मार्च रोजी नागपुरात झाली. पहिल्या १० हजार कोरोनाबाधितांचा टप्पा ओलांडायला १३३ दिवसाचा कालावधी लागला. परंतु आंतर जिल्हा वाहतुकीवरील प्रतिबंध हटविण्यात आल्याने १६ दिवसातच १० हजार रुग्णांची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्येचा हा टप्पा गाठायला आठ दिवस आणि नंतर पाच दिवस लागले. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला चार दिवसातच १० हजार रुग्णांची भर पडली. आता हा कालावधी आणखी कमी होऊन तीन दिवसावर आला आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.