पासपोर्टसाठी पाच रुपये भरायला लावून एक लाख उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 09:02 PM2023-05-26T21:02:08+5:302023-05-26T21:02:28+5:30
Nagpur News तुमचा पासपोर्ट स्पीड पोस्ट ऑफिसमध्ये आला असून, ॲक्टिव्हेशन चार्जसाठी ऑनलाईन पाच रुपये भरा, असे सांगून सायबर गुन्हेगाराने एका व्यक्तीच्या खात्यातील एक लाख रुपये ऑनलाईन वळते केले.
नागपूर : तुमचा पासपोर्ट स्पीड पोस्ट ऑफिसमध्ये आला असून, ॲक्टिव्हेशन चार्जसाठी ऑनलाईन पाच रुपये भरा, असे सांगून सायबर गुन्हेगाराने एका व्यक्तीच्या खात्यातील एक लाख रुपये ऑनलाईन वळते केले. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १० ते १४ मे दरम्यान घडली आहे.
हरिष घोडकांजी झोडे (वय २८, रा. महाकाळकर ले-आऊट, वाठोडा) यांनी पासपोर्ट बनविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर आरोपी मोबाईल क्रमांक ९८२९१७०००८, ८२७४०६२६५४ धारकाने हरिष यांना तुमचा पासपोर्ट स्पीड पोस्ट ऑफिसमध्ये आल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर आरोपीने ॲक्टिव्हेशन चार्जसाठी पाच रुपये ऑनलाईन भरायला लावले. हरिष यांनी पैसे भरताच त्यांच्या खात्यातून तीनवेळा एक लाख रुपये सायबर गुन्हेगाराने वळते करून त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी हरिष झोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी आरोपी मोबाईल धारकाविरुद्ध कलम ४२०, सहकलम ६६ (सी), ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
..............