बापरे; नागपूर शहरात एक लीटर केरोसीन आता १०० रुपयाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 07:30 AM2022-07-06T07:30:00+5:302022-07-06T07:30:02+5:30
Nagpur News दोन महिन्यांपूर्वी नागपूर शहरात ३८ रुपये लिटरप्रमाणे विकले जाणारे केरोसीन आता १०० रुपये लीटर भावाने विकले जात आहे.
रियाज अहमद
नागपूर : दोन महिन्यांपूर्वी नागपूर शहरात ३८ रुपये लिटरप्रमाणे विकले जाणारे केरोसीन आता १०० रुपये लीटर भावाने विकले जात आहे. गेल्या दोन महिन्यांत केरोसीनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. महाग झालेले केरोसीन आता गोरगरीब कार्डधारकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
केरोसीनचे दर प्रचंड वाढल्याने गरीब कार्डधारक ते उचलत नाही. नागपूर शहरात दर महिन्याला लाभार्थीना वाटपासाठी १ लाख ४४ हजार लीटर केरोसीन उपलब्ध केले जाते. मात्र पुरवठा विभागाच्या आकड्याचा विचार करता मागील तीन महिन्यात नागपूर शहरात ४ लाख ३२ हजार लीटर पैकी ३ लाख ७२ हजार लीटर केरोसीन सरकारकडे परत करण्यात आले.
नागपूर शहरात अजूनही हजारो गरीब कुटुंबांकडे गॅस कनेक्शन नाही. अशा लोकांना रेशन कार्डवर केरोसीन दिले जाते. असे ५४ हजार लाभार्थी आहेत. परंतु केरोसीनचे भाव वाढल्याने ते खरेदी करणे या लोकाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. नागपूर शहराला खापरी डेपोतून केरोसीनचा पुरवठा केला जातो.
असे वाढले दर
मार्च महिन्यात खापरी डेपोतून प्रति एक हजार लीटर केरोसीन ३२ हजार ९४६ रुपये ८५ पैशाला मिळत होते. एप्रिल महिन्यात ३४ हजार ३२५ रुपये, मे मध्ये ३४,४२१ रुपये, तर जून महिन्यात ८१ हजार १०७ रुपये २० पैसे प्रति एक हजर लिटरला मोजावे लागत आहे. १ जुलै मध्ये पुन्हा दर वाढले असून ९५ हजार ७० रुपये १० पैशावर गेले आहे. हा डेपोचा दर झाला. वितरकाला प्रति लिटर ५० पैसे कमिशन दिले जाते. परंतु वाहतुकीसोबत अन्य खर्च येतो. त्यामुळे दरामध्ये १ ते १.५० रुपये वाढ होते. त्यानंतर हॉकर्सकडे केरोसीन जाते. नियमानुसार हॉकर्सला प्रति लिटर २५ पैसे मिळतात. मात्र अन्य खर्च गृहीत धरूत तो १ रुपये कमीशन वसूल करतो. मार्च महिन्यात खापरी डेपोत केरोसीनचे दर प्रति लिटर ३४ रुपये ४२ पैसे होते. कार्डधारकापर्यंत पोहचेपर्यत दर ३७ रुपये प्रति लीटर होते. आता डेपोतील दर ९५ रुपये ७० पैसे प्रति लीटर आहे. तर लाभार्थीला यासाठी १०० रुपये मोजावे लागतात.
केरोसीन दरात वाढ झालेली आहे. शासन निर्णयानुसार केरोसीन वितरीत केले जाते. कोट्यानुसार केरोसीन मिळत आहे. नियमानुसार कार्डधारक प्रति व्यक्तीला २ लीटर दिले जाते. कार्डवर ३ हून अधिक व्यक्ती असल्यास ४ लीटर केरोसीन दिले जाते.
- भास्कर तायडे. अन्न पुरवठा अधिकारी नागपूर
किमतीवर नियंत्रण नाही
केरोसीन जीवनावश्यक वस्तू आहे. परंतु याच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण नाही. गरीब कार्डधारकांना केरोसीनची गरज आहे. मात्र केरोसीन खरेदी करणे त्याला अशक्य झाले आहे. सरकारला याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे विदर्भ रास्त भाव दुकानदार व केरोसिन विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले.