एक आरएफओ दोन वनपाल निलंबित
By admin | Published: October 16, 2015 03:21 AM2015-10-16T03:21:11+5:302015-10-16T03:21:11+5:30
दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील चनोडा येथील रोपवन घोटाळ्याप्रकरणी वन विभागातर्फे संबंधित वन परिक्षेत्र ...
वन विभागात खळबळ : चनोडा येथील रोपवन घोटाळा
नागपूर : दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील चनोडा येथील रोपवन घोटाळ्याप्रकरणी वन विभागातर्फे संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्यासह (आरएफओ) दोन वनपाल व एका वनरक्षकाविरुद्ध निलंबन करवाई करण्यात आली आहे. आरएफओ एस. बी. गोसावी, वनपाल पी. एम. खोरगडे, वनपाल एन. एस. वाडीझरे व वनरक्षक मुंडे अशी त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यासंबंधी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी. एस. के. रेड्डी यांना विचारणा केली असता, त्यांनी संबंधित चौघांविरुद्ध निलंबन करवाई करण्यात आली असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे, या घोटाळ््यासंबंधी ‘लोकमत’ ने सर्वप्रथम बातमी प्रकाशित करू न, या प्रकरणाचा भंडाफोड केला होता. या निलंबन कारवाईने वन विभागात चांगलीच खळबळ माजली आहे. माहिती सूत्रानुसार दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील मौजा चनोडा येथील कक्ष क्र. ३६४ मधील १७२ हेक्टर क्षेत्रात रोपवन लागवडीच्या नावाखाली संबंधित अधिकाऱ्यांनी कोट्यवधीचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. जाणकारांच्या मते, येथील रोपवनाची सर्व कामे अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु येथे मजुरांना कमी दराने मजुरी देण्यात आल्याची माहिती आहे. शिवाय कोणत्याही प्रकारची बेसलाईन व ग्रेडलाईन न टाकता रोपवनाची कामे करण्यात आली. एवढेच नव्हे, तर संपूर्ण रोपवनासाठी एकूण ४ लाख ३० हजार खड्डे खोदून त्यासाठी ४१ लाख १९ हजार ४०० रुपयांची मजुरी देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मजुरांना केवळ १७ लाख २० हजार रुपयेच देऊन, इतर २३ लाख ९९ हजार ४०० रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वन कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज पटेल व निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चिमोटे यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी. एस. के. रेड्डी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यावर रेड्डी यांनी विभागीय वन अधिकारी केवल डोंगरे यांच्या अध्यक्षतेखालील एक चौकशी समिती स्थापन केली होती.
समितीने मागील महिन्यात या प्रकरणाची चौकशी करून सीसीएफ रेड्डी यांच्याकडे सादर केलेल्या अहवालावरून ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)