निर्यातबंदीनंतर कांद्याच्या किमतीत घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 08:41 PM2020-09-16T20:41:14+5:302020-09-16T20:46:07+5:30
देशातून निर्यात वाढल्यानंतर अत्यावश्यक वस्तूच्या कायद्यातून वगळण्यात आलेल्या कांद्यावर केंद्र शासनाने निर्यातबंदी घातली आहे. त्यानंतर बाजारात कृत्रिमरीत्या वाढलेले कांद्याचे भाव अचानक खाली आले आहेत. कळमना ठोक बाजारात प्रति किलो भाव ६ ते ८ रुपयांनी कमी होऊन २० रुपयांवर स्थिरावले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातून निर्यात वाढल्यानंतर अत्यावश्यक वस्तूच्या कायद्यातून वगळण्यात आलेल्या कांद्यावर केंद्र शासनाने निर्यातबंदी घातली आहे. त्यानंतर बाजारात कृत्रिमरीत्या वाढलेले कांद्याचे भाव अचानक खाली आले आहेत. कळमना ठोक बाजारात प्रति किलो भाव ६ ते ८ रुपयांनी कमी होऊन २० रुपयांवर स्थिरावले आहेत.
निर्यातबंदीनंतर दरदिवशी कांद्याचे भाव कमी होत आहेत. याशिवाय बाजारात दरदिवशी २० ट्रक ची आवक होत आहे. बुधवारीही एवढीच आवक होती. यापूर्वी व्यापारी निर्यातीचा फायदा घेत आणि आवक कमी असल्याचे सांगून साठेबाजी करून भाववाढ करीत होते. पुढील काही दिवसात भाव कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
कळमन्याची कांद्याची आवक बुलडाणा, नाशिक, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून होत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त आहे. त्यामुळे भाववाढीची शक्यता कमीच आहे. पूर्वी काही व्यापारी पुरवठा कमी असल्याचे कारण सांगून साठेबाजी करीत होते. शिवाय भाववाढ करून नफा कमवित होते. पण निर्यातबंदीनंतर पूर्वीच्या तुलनेत पुरवठा होत आहे. केंद्र सरकारने वेळीच योग्य पावले उचलल्याने भाव कमी होऊन ग्राहकांना दिलासा मिळाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
रस्त्याच्या कडेला होत आहे विक्री
अनेक युवक कळमन्यातून कांदे खरेदी करून छोट्या बोरीमध्ये ५ आणि १० किलो पॅक करून विक्री करीत आहेत. किरकोळमध्ये कांद्याचे ३० ते ३५ रुपये भाव आहेत. तर हे युवक २२ ते २५ रुपयांत विक्री करीत आहेत. सध्या १० किलो कांद्याचे कट्टे जागोजागी उपलब्ध आहेत. ग्राहकांना स्वस्तात मिळत आहे.