निराधार पालकांना कोण करणार मदत
नागपूर : कोरोना विषाणू संसर्गामुळे एकमेव आधार असलेल्या अपत्याचा मृत्यू झाल्याने, निराधार झालेल्या पालकांचे काय आणि त्यांना कोण मदत करणार? असे प्रश्न आता निर्माण झाले आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाने जिल्ह्यात अनेक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये आई-वडिलांचा एकमेव आधार असलेल्या अपत्याचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आईवडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. परंतु एकमेव आधार असलेल्या मुलाचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे निराधार झालेल्या वृद्ध पालकांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- लक्ष देणारे कुणीच नाही
१) हुडकेश्वररोडवरील एका कुटुंबातील ४० वर्षीय एकुलत्या एका मुलाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्याच्या मागे आई-वडील आणि पत्नी होती. मुलाच्या मृत्यूनंतर पत्नी तिच्या माहेरी गेली. आता आई-वडील दोघेच घरात आहे. या दोन्ही ज्येष्ठांकडे लक्ष देणारे कुणीच नसल्याने त्यांच्या जगण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.
२) सोमलवाडा परिसरात सुद्धा अशाच एका सुखवस्तू कुटुंबात कोरोनामुळे अवकळा आली. येथेही त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याची पत्नी माहेरी निघून गेली. आई-वडील दोघेही पेन्शनर आहे. पण जवळ कुणीच नाही. दोघांनीही सत्तरी गाठली आहे. पैसा असूनही त्यांच्याकडे लक्ष देणारे कुणीच नाही.
- अर्थसाहाय्याबरोबर आधाराचीही गरज आहे
कुटुंबातील एकुलत्या एका मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पालकांचा आधार गेला आहे. त्यामुळे पालक निराधार झाले आहे. राष्ट्रप्रेमी युवा दलाने कोरोनाच्या काळात घरोघरी सेवा दिली. यात ज्येष्ठांच्या वेदनादायी समस्या पुढे आल्या. मुले नोकरी, व्यवसायानिमित्त विदेशात आहेत आणि वयोवृद्ध आईवडील दोघेच घरात होते. त्यांच्याकडे लक्ष देणारे कुणी नव्हते. अनेकांची आर्थिक बाजू भक्कम होती, पण आधार कुणाचाच नव्हता. त्यांच्यात भीतीचे वातावरण होते. कोरोनामुळे एकुलता एक मुलगा गमाविलेल्या पालकांना अर्थसाहाय्याबरोबरच मानसिक, भावनिक आधाराचीही गरज आहे.
बाबा मेंढे, अध्यक्ष, राष्ट्रप्रेमी युवा दल
- ज्येष्ठांचे प्रश्न वेगळे
थकलेले शरीर असल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात कोण घेऊन जाणार, औषध आणण्यासाठी कोणाचा आधार घेणार, तसेच दैनंदिन गरजा भागविण्यासाठी धावपळ कशी करणार, अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा सामना करण्याची वेळ ज्येष्ठ नागरिकांवर आली आहे.
कोरोनाचे एकूण रुग्ण - ३,३१,९२३
बरे झालेले रुग्ण - ३,२४,८८७
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - २,३४६
एकूण मृत्यू - ५,२७६