-तरच नागपुरात १४ दिवसांचा ‘स्मार्ट लॉकडाऊन’ : पालकमंत्री राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:15 PM2020-07-27T23:15:24+5:302020-07-27T23:17:00+5:30
जनता कर्फ्यूनंतर लवकरच कठोर लॉकडाऊन लागण्याची शहरात चर्चा आहे. दरम्यान, पालकमंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची आज घोषणा केली. ते म्हणाले, सर्व बाबींचा विचार केल्यानंतर लॉकडाऊन लावण्याची खरेच गरज पडली तरच लॉकडाऊन लावला जाईल, परंतु तो १४ दिवसांचा स्मार्ट लॉकडाऊन असेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जनता कर्फ्यूनंतर लवकरच कठोर लॉकडाऊन लागण्याची शहरात चर्चा आहे. दरम्यान, पालकमंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची आज घोषणा केली. ते म्हणाले, सर्व बाबींचा विचार केल्यानंतर लॉकडाऊन लावण्याची खरेच गरज पडली तरच लॉकडाऊन लावला जाईल, परंतु तो १४ दिवसांचा स्मार्ट लॉकडाऊन असेल.
राऊत यांनी सोमवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मृत्यूदर कमी ठेवण्याची जबाबदारी प्रशासनासोबतच पालकमंत्र्यांचीही आहे. लॉकडाऊनमध्ये आर्थिक व सामाजिकदृष्ट्या लोक तुटतात व आत्महत्या करतात. आर्थिक व्यवहारही कमी होतो. त्यामुळेच लॉकडाऊन लावण्यापूर्वी सर्व बाबींचा विचार करायला हवा. त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. यात पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे वरिष्ठ अधिकारी असतील. ही समिती परिस्थिती पाहून लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय घेईल. तसेही केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार ग्रामीणची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि शहराची जबाबदारी ही मनपा आयुक्तांकडे आहे. पालकमंत्र्यांसह इतर लोकप्रतिनिधी केवळ मार्गदर्शन करू शकतात. लॉकडाऊनबाबत पत्रपरिषदेत संभ्रमही दिसून आला. एकीकडे परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करण्यात आला तर दुसरीकडे लॉकडाऊनबाबतही इशारा देण्यात आला.
राऊत यांनी हे स्पष्ट केले की, खूपच गरज पडली तरच लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला जाईल. परंतु तो स्मार्ट लॉकडाऊन असेल आणि कमीत कमी १४ दिवसाचा कर्फ्यूसह राहील. या दरम्यान उद्योग, कार्यालयात कामे कशी सुरू राहावीत, या काळात कुणीही उपाशीपोटी मरू नये, आर्थिक संकटात येऊ नये, याची खबरदारी घेण्यात येईल. यादरम्यान नागरिकांना दिलासा मिळावा याचा प्रयत्न केला जाईल. मधुमेह रुग्ण, गर्भवती महिला, हृदयरोगी यांना घरातच एकांतवासात राहावे लागेल. कॅशलेश देवाण-घेवाणीला प्रोत्साहन दिले जाईल.
प्रत्येक वस्तीत कोरोना दक्षता समिती
पालकमंत्र्यांनी सांगितले की, नागरिकांना कोविड-१९ बाबत जागरूक करण्यासाठी प्रत्येक वस्तीमध्ये कोरोना दक्षता समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती कोरोना संसर्ग काळात नागरिकांना कसे राहावे, याबाबत मार्गदर्शन करेल. तसेच प्रत्येक वॉर्डात अॅण्टिजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. ती नि:शुल्क राहील. तर खासगी रुग्णालये व क्लिनिकमध्ये अॅण्टिजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करण्यात येईल. यासाठी ७०० रुपयांचे शुल्क घेण्यात येईल. सरकारी व मनपा रुग्णालयातही ही सुविधा नि:शुल्क राहील.
प्रशासनाचा बचाव
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर होत असलेल्या आरोपादरम्यान पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासनासह पोलीस विभागाच्या कामाची प्रशंसा केली. या अधिकाऱ्यांमुळेच नागपुरात कोरोना नियंत्रणात आहे. आज डॉक्टरांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सारेच थकले आहेत. परंतु अजूनही ते निकराने लढा देत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात
विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात एकूण २८४८ पॉझिटिव्ह लोकांपैकी केवळ ८१५ अॅक्टिव्ह आहेत. ग्रामीणमधील १०३५ रुग्णांपैकी केवळ ६३४ अॅक्टिव्ह आहेत. व्हेंटिलेटर व बेड पुरेसे आहेत. त्यामुळेच संस्थागत क्वारंटाईन बंद करून होम क्वारंटाईन सुरू करण्यात आले आहे. ग्रामीणमध्ये मृत्यूदर १.३ व शहरात १.५ आहे. देशात तो सर्वात कमी आहे. दररोज २२०० टेस्ट करण्याची सुविधा विकसित करण्यात आली आहे. १०,८०३ अॅण्टिजेन टेस्ट झाल्या आहेत.