लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या समाजात अनेक गुणी माणसे आहेत. त्यांच्या गुणांची कदर झाली पाहिजे. लोकांच्या नकारात्मक बाजूपेक्षा गुणांची चर्चा जास्त झाली तर समाज सशक्त होतो. गुणांची पारख करणारे व कौतुक करणारे लोकदेखील वाढायला हवेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विरोधकांच्यादेखील गुणांची कदर झाली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. भोसले प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या राजरत्न पुरस्कारांचे गुरुवारी वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.महाल येथील सिनियर भोसला पॅलेस येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्याला अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ मठाचे श्रीनाथ पीठाधीश्वर आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज, भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजे रघुजी महाराज भोंसले, राजरत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. राजे मुधोजी भोसले, कार्यक्रमाचे संयोजक लक्ष्मीकांत देशपांडे, ठाकूर किशोरसिंह बैस प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील नऊ जणांचा सन्मान करण्यात आला. आपल्या समाजात दुसऱ्यांना मार्ग दाखविणारे अनेक जण दिसून येतात. मात्र अनेक जण स्वत: त्या मार्गावर चालत नाहीत. केवळ मार्ग दाखविणे याने काम होणार नाही. मार्ग दाखविण्यापेक्षा त्या मार्गावर चालणारे झाले पाहिजे, दुसऱ्यांच्या आदर्श मार्गावर चालण्याची लोकांची इच्छा असते. मात्र हिंमत होत नाही. त्यांच्यात आत्मविश्वास जागविला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. मोहन भागवत यांनी केले. देशातील इतर राजघराणे आपापसातील भांडणात व्यस्त राहिले. मात्र भोसले घराण्याने अंतर्गत कलह टाळला. राजांमध्ये अहंकार असायचा. मात्र भोसले त्यापासून दूर राहिले. अहंकाराला नियंत्रणात आणण्यासाठी परिश्रम करावे लागतात, असेदेखील ते म्हणाले.पुरस्कार हे चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना समोर जाण्याची प्रेरणा देतात. कर्तृत्वाची पूजा ही कर्तृत्ववान व्यक्तीच करु शकतात, असे सांगत आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी भोसले घराण्याच्या महत्तेवर प्रकाश टाकला. राजे मुधोजी भोसले यांनी प्रास्ताविकातून पुरस्कारांबाबत माहिती दिली. एम.ए.कादर व सारंग ढोक यांनी संचालन केले तर ठाकूर किशोरसिंह बैस यांनी आभार मानले. अर्जुन कृष्णन्न नायर याने गणेशवंदना नृत्य सादर केले.शहीद सैनिकांना श्रद्धांजलीपुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना कार्यक्रमादरम्यान श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व मान्यवर तसेच उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली अर्पण केली.यांचा झाला गौरव
- स्वानंद पुंड (इतिहास, साहित्य)
- विष्णू मनोहर (वैशिष्ट्यपूर्ण कार्य)
- स्मिता काटवे-मामारर्डे (क्रीडा)
- संतोष साळुंके (सांस्कृतिक)
- जयंत हरकरे (पत्रकारिता छायाचित्रकार)
- अविनाश पाठक (पत्रकारिता)
- अर्जुन कृष्णन्न नायर (वैशिष्ट्यपूर्ण कार्य-१८ वर्षांखालील)
- सार्थक धुर्वे (क्रीडा-१८ वर्षांखालील)