नागपूर : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वीज केंद्रांमध्ये संशोधक सहायक बनण्याची संधी मिळणार आहे. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान (व्हीएनआयटी) आणि महाजेनकोच्या २१९० मेगावॅट क्षमतेच्या कोराडी आणि १३४० मेगावॅट क्षमतेच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र यांच्यात सोमवारी करार झाला. याअंतर्गत संस्थेच्या पदव्युत्तर आणि पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘संशोधन सहायक’ म्हणून काम करू शकतील.
करारप्रसंगी व्हीएनआयटीचे संचालक प्रमोद पडोळे, डीन संशोधन व सल्लागार माधुरी चौधरी, मेकॅनिकल विभाग प्रमुख ठोंबरे, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख विजय बोरघाटे तर महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे, खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे, उपमहाव्यवस्थापक (मासं) डॉ. प्रकाश प्रभावत, कार्यकारी अभियंता विजय अढाव, जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते, उपकार्यकारी अभियंता प्रवीण बुटे, धनंजय दाणी प्रामुख्याने उपस्थित होते.
करारांतर्गत कोराडी-खापरखेडा केंद्रात १२ विद्यार्थ्यांना संधी मिळेल. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना एक वर्षापर्यंत दरमहा २५ हजार रुपये व पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन महिन्यासाठी २० हजार रुपये दरमहा दिले जातील.
महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे, पुरुषोत्तम जाधव, बाळासाहेब थिटे, डॉ. मानवेंद्र रामटेके, संजय मारुडकर, कार्यकारी संचालक भीमाशंकर मंता यांच्या मार्गदर्शनात नागपूर, पुणे, औरंगाबाद, मुंबई, रायगड, चंद्रपूर, कराड, अमरावती आणि जळगाव अशा ९ अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे ६० विद्यार्थ्यांना “संशोधन सहायक” म्हणून संधी दिली जाईल.