नागपूर जिल्ह्यातल्या सेलू येथे सेंद्रिय पद्धतीने फुलविली संत्र्याची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 10:09 PM2017-12-09T22:09:56+5:302017-12-09T22:12:06+5:30

रासायनिक खतांचा वापर करून शेतीतून उत्पन्न घेणे खर्चिक काम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडला जातो. त्याऐवजी सेंद्रिय पद्धतीने दोन एकरात संत्र्याचे भरघोस उत्पादन घेण्याचा प्रयोग एक प्रगतीशील शेतकरी करीत आहे, त्यांचे नाव आहे सुधाकर कुबडे.

Orange garden blossomed by organic method in Nagpur | नागपूर जिल्ह्यातल्या सेलू येथे सेंद्रिय पद्धतीने फुलविली संत्र्याची बाग

नागपूर जिल्ह्यातल्या सेलू येथे सेंद्रिय पद्धतीने फुलविली संत्र्याची बाग

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्याची भरारी दोन एकरात भरघोस उत्पादन

विजय नागपुरे ।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : रासायनिक खतांचा वापर करून शेतीतून उत्पन्न घेणे खर्चिक काम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडला जातो. त्याऐवजी सेंद्रिय पद्धतीने दोन एकरात संत्र्याचे भरघोस उत्पादन घेण्याचा प्रयोग एक प्रगतीशील शेतकरी करीत आहे, त्यांचे नाव आहे सुधाकर कुबडे. त्यातून त्यांनी खर्चावर नियंत्रण मिळवित तोट्यातली शेती नफ्यात आणली आहे. त्यांच्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आता प्रेरणा मिळत आहे.
सुधाकर कुबडे, रा. सेलू, ता. कळमेश्वर यांच्याकडे वडिलोपार्जित सात एकर शेती आहे. यापूर्वी त्यांनी रासायनिक खतांचा वापर करीत १५० संत्रा झाडे लावली. यात रासायनिक खतांचा व फवारणीचा वाढता खर्च पाहता उत्पादनात तूट दिसून आली. त्यामुळे त्यांनी कृषी विभागाचे हेमंतसिंग चव्हाण यांच्याकडून सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पुन्हा १५० संत्रा झाडे दोन एकरात लावली. गेल्या १० वर्षांपासून ते सेंद्रिय पद्धतीने दोन एकरात संत्र्याचे उत्पादन घेत आहेत.
यासाठी दोन गाई, दोन बैल यांच्या शेण व गोमूत्रापासून घनजीवामृत व जीवामृत बनवून संत्रा झाडांना खत देणे सुरू केले. यात रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद केल्याने संत्रा झाडावर येणारा डिंक्या व इतर रोगराईच्या प्रमाणात कमालीची घट झाली. डिंक्यासाठी शेण, गोमूत्र व कडुलिंबाचा पाला याची पेस्ट बनवून डिंक्या झालेल्या ठिकाणी लावायची. तसेच फवारणी करण्यासाठी कडुलिंब, सीताफळ, एरंडी, पपई, गुडवेल, गणेरी, रुई, करंजी, निरगुडी आदी १० प्रकारचा पाला प्रत्येकी दोन किग्रॅ प्रमाणात घेऊन त्याला बारीक कापायचा आणि त्याला २०० लिटर पाण्यात भिजत ठेवायचा. त्यात पाच लिटर गोमूत्र व ५ किग्रॅ गावराण (देशी) गाईचे शेण मिसळवून ४० दिवस सकाळ-संध्याकाळ ढवळायचे. नंतर फवारणीसाठी उपयोगात आणायचे.


संत्र्याचा आकार वाढविण्याचा अजब फंडा
सुधाकर कुबडे यांनी संत्र्याचा आकार मोठा व गुळगुळीत बनविण्यासाठी तीळ, गहू, हरभरा, उडिद, मोट, मुंंग, बरबटी या अन्नधान्याला अंकुर येईपर्यंत भिजत ठेवायचे. नंतर त्याची पेस्ट बनवून गोमूत्रात मिसळवून तीन दिवसांनी फवारणीसाठी वापरायचे. या सर्व बाबींमुळे संत्रा शेतीवर केवळ मजुरीचाच खर्च होत असल्याने खर्चात कमालीची घट झाली. यामुळे होणाऱ्या उत्पादनाने आर्थिक बाजू भक्कम होत गेली. त्यांच्या या प्रयोगामुळेच त्यांना राज्य शासनाने ‘सेंद्रिय कृषिभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले.

शेती ठरली आकर्षण केंद्र
सेंद्रिय पद्धतीने संत्र्याचे उत्पादन घेत असल्याने सुधाकर कुबडे यांची दूरवर कीर्ती पोहोचली. त्यामुळे आतापर्यंत अनेकांनी त्यांच्या संत्रा बागेला भेट दिली. महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर, नैसर्गिक शेतीतज्ज्ञ सुभाष पाळेकर, सेंद्रिय शेती धोरण समितीचे अध्यक्ष शंकरराव राऊत, डॉ. अडसूळ, डॉ. क्रांती, डॉ. राजपूत, विजय कुमार यांच्यासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यातील आणि देश-विदेशातील तज्ज्ञांनी शेतीला भेट दिली, हे विशेष!

आॅनलाईन संत्रा विक्री
नैसर्गिक शेतमाल उत्पादक संघ यांचा व्हॉटस्अप ग्रुप असून त्यावर संत्रा उत्पादनाबाबत माहिती टाकल्यानंतर संबंधितांशी ते संपर्क साधतात. संत्र्याची तीन साईजमध्ये विभागणी करून त्याप्रमाणे त्याचा दर ठरवून संत्र्याचे बिल व पाठविण्याचा खर्च बँक खात्यात जमा झाल्यानंतर संत्रा दुसरीकडे पाठविण्यात येतो. संत्रा खरेदीदार हे दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, रायपूर येथील असल्याने त्यांना रेल्वेने माल पोहोचविला जातो. आॅनलाईन सुविधमुळे संत्र्याला चांगला भाव मिळत आहे.
- सुधाकर कुबडे,
सेंद्रिय कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी, सेलू.

Web Title: Orange garden blossomed by organic method in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती