ग्राहक मंचचा आदेश : ५१ हजार १८ टक्के व्याजाने परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 10:10 PM2019-02-01T22:10:32+5:302019-02-01T22:11:47+5:30
तक्रारकर्तीचे ५१ हजार रुपये १८ टक्के व्याजाने परत करण्यात यावे व तिला २५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अंबिका बिल्डकॉनला दिलेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तक्रारकर्तीचे ५१ हजार रुपये १८ टक्के व्याजाने परत करण्यात यावे व तिला २५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अंबिका बिल्डकॉनला दिलेत.
दीप्ती क्रिष्णानी असे तक्रारकर्तीचे नाव आहे. ५१ हजार रुपयांवर १० डिसेंबर २०१० ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू होणार आहे. भरपाईमध्ये शारीरिक-मानसिक त्रासाचे २० हजार व तक्रार खर्चाच्या ५ हजार रुपयांचा समावेश आहे. आदेशांचे पालन करण्यासाठी कंपनीला ३० दिवसाची मुदत देण्यात आली. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे अंबिका बिल्डकॉनला जोरदार दणका बसला.
तक्रारीतील माहितीनुसार, क्रिष्णानी यांनी अंबिका बिल्डकॉनच्या मौजा गोधनी येथील अंबिका इस्टेट योजनेतील थ्री-बीएचके घर ८ लाख ५० हजार रुपयांत खरेदी करण्यासाठी १० डिसेंबर २०१० रोजी करारनामा केला होता व कंपनीला इसार म्हणून ५१ हजार रुपयाचा धनादेश दिला होता. त्यानंतर कंपनीने संबंधित ठिकाणी डिसेंबर-२०१३ पर्यंत कोणतेही बांधकाम केले नाही. तसेच, ते क्रिष्णानी यांची भेट घेणे टाळत होते. त्यामुळे क्रिष्णानी यांनी कंपनीला १५ आॅक्टोबर २०१६ रोजी कायदेशीर नोटीस पाठवली. कंपनीने त्यावरही काहीच प्रतिसाद दिला नाही. परिणामी, क्रिष्णानी यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचने त्यांची तक्रार अंशत: मंजूर करून वरीलप्रमाणे निर्णय दिला.
तक्रारकर्तीस दोषपूर्ण सेवा दिली
कंपनीने तक्रारकर्तीच्या नोटीसला कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच, त्यांची भेट घेणेही टाळले. तक्रारकर्ती ही कराराप्रमाणे उर्वरीत रक्कम देऊन घराचे विक्रीपत्र नोंदवून घेण्यास तयार होती. परंतु, कंपनीने साईटवर कोणतेही बांधकाम केले नाही. कराराची पूर्तता केली नाही. अशा प्रकारे कंपनीने तक्रारकर्तीस दोषपूर्ण सेवा दिली. अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.