नागपुरातील ‘१६० खोल्यांचे गाळे’ वसाहत रिकामे करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 03:47 PM2020-09-16T15:47:24+5:302020-09-16T15:49:09+5:30
हिवाळी अधिवेशन आले की सिव्हिल लाईन्स येथील ‘१६० खोल्यांचे गाळे रिकामे करणे येथील निवासीयांना भाग पडते आणि यावेळीही तसे आदेश गाळेधारकांकडे येऊन धडकले आहेत. मात्र यावेळी कोरोना महामारीने परिस्थिती भयावह असताना गाळेधारकांसमोर संकट उभे ठाकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिव्हिल लाईन्स येथील ‘१६० खोल्यांचे गाळे’ या वसाहतीत निवासी असलेल्या कुटुंबीयांची दरवर्षी होणारी फरफट यावषीर्ही कायम आहे. हिवाळी अधिवेशन आले की गाळे रिकामे करणे येथील निवासीयांना भाग पडते आणि यावेळीही तसे आदेश गाळेधारकांकडे येऊन धडकले आहेत. मात्र यावेळी कोरोना महामारीने परिस्थिती भयावह असताना गाळेधारकांसमोर संकट उभे ठाकले आहे.
बाहेर खोल्या भाड्याने मिळत नसल्याने कुठे जायचे की रस्त्यावर राहायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. संभ्रम कायम असताना अखेर ७ डिसेंबरपासून नागपूरला राज्य मंत्रिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार, अशी घोषणा सध्यातरी करण्यात आली आहे. या परिस्थितीत प्रशासनाने तयारीच्या कामाला सुरुवात केली आहे. याअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने इतरांच्या ताब्यात असलेले आमदार निवास, नागभवन, रविभवन रिकामे करण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुसार १६० खोल्यांचे गाळे रिकामे करण्याची तयारी चालली असून येथील निवासीयांना ३० सप्टेंबरपर्यंत गाळे खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तशी करारानुसार ही दरवषीर्ची प्रक्रिया आहे. हिवाळी अधिवेशन आले की येथील कुटुंबांना त्यांचे बस्तान इतरत्र हलवावेच लागते. येथील नागरिक हा दोन महिन्यांचा काळ इतर ठिकाणी भाड्याने खोली घेऊन काढतात. मात्र यावर्षीची परिस्थिती नेहमीसारखी नाही.
कोरोना संकटामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. अशावेळी जायचे कुठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सध्या या वसाहतीमध्ये १४० च्या जवळपास कुटुंब निवासाला आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत खाली करण्याची नोटीस मिळताच बहुतेकांनी भाड्याने खोली शोधण्यासाठी धाव घेतली. मात्र कोरोना संकटात कुणी खोली द्यायला तयार नसल्याचे नागरिकांनी सांगितले. महामारीत वृद्ध आईवडिलांना, लहान मुलांना घेऊन उघड्यावर राहायचे काय, असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनाही पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. मात्र सरकारी आदेशाचे पालन करणारे प्रशासनही हतबल असल्याने कुटुंबीय निराश झाले आहेत. त्यामुळे लोकमतकडे त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.
प्रशासनाने करून द्यावी व्यवस्था
येथे राहणारी काही कुटुंबे १५-२० वर्षापासून येथे राहतात. दरवर्षी ते विनातक्रार खोली सोडतात. मात्र यावेळी उद््भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे संकटाचा सामना करावा लागत आहे. तीन वर्षापूर्वी बांधकाम विभागाकडून व्यवस्था करून दिली जायची, मात्र पुढे ती सोय बंद केली. यावर्षीची परिस्थिती लक्षात घेत प्रशासनाने येथील कुटुंबीयांची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.