नागपूर : विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती (झेडटीसीसी) नागपूरअंतर्गत पहिल्यांदाच एकाच दिवशी दोन ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत व्यक्तीकडून अवयवदान झाले. गोडे व शर्मा कुटुंबियांचा पुढाकारामुळे चार रुग्णांना नवे जीवन मिळाले. पहिल्या अवयवदात्याचे नाव कमलकांत गोडे (६०) रा. आयुर्वेदीक कॉलनी सक्करदरा तर दुसऱ्या अवयवदात्याचे नाव मदन प्रसाद शर्मा (६६). रा. आशियाना नगर पाटणा बिहार असे आहे. ‘झेडटीसीसी’ने दिलेल्या माहितीनुसार कमलकांत गोडे हे खासगी व्यवसायीक होते. काही दिवसांपूर्वी अचानक त्यांची प्रकृती खालवली. त्यांना लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मेंदूमध्ये तीव्र रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले.
तीन दिवस उपचारानंतरही त्यांची प्रकृती खालवत गेली. ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांची तपासणी करून ‘ब्रेन डेड’ घोषीत केले. हॉस्पिटलचे डॉ. अश्विनी चौधरी आणि पल्लवी जवादे यांनी नातेवाईकांना अवयव दानाविषयी समुपदेशन केले. कमलकांत यांच्या पत्नी रेखा, मुलगा अंकित आणि भूषण यांनी अवयवदानास संमती दिली. त्यानंतर ‘झेडटीसीसी’ला ही माहिती देण्यात आली. ‘झेडटीसीसी’ने प्रतीक्षा यादी तपासून अवयवांचे वाटप केले. न्यू इरा हॉस्पिटलमधील ४९ वर्षीय महिलेला यकृताचे दान करण्यात आले. याच हॉस्पिटलच्या ६२वर्षीय एका पुरुष रुग्णाला पहिले मूत्रपिंड तर दुसरे मूत्रपिंड ४६ वर्षीय एका महिलेला दान करण्यात आले.
बिहारामधील व्यक्तीचे नागपुरात अवयवदान किडनीवरील उपचारासाठी मदन शर्मा हे बिहारहून नागपुरात आले होते. किम्स किंग्जवे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. याच दरम्यान त्यांची अचानक प्रकृती खालवली. त्यांना ‘ब्रेन हॅमरेज’ झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांची तपासणी करून ‘ब्रेन डेड’ झाल्याचे घोषित केले. हॉस्पिटलच्या समन्वयक शालिनी पाटील यांनी नातेवाईकांना अवयव दानाविषयी समुपदेशन केले. शर्मा यांच्या पत्नी मंजू देवी आणि मुलगा एकलव्य यांनी अवयवदानास संमती दिली. त्यानंतर विभागीय प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) ही माहिती देण्यात आली. समितीने प्रतीक्षा यादी तपासून अवयवांचे वाटप केले. शर्मा यांना किडनीचा आजार असल्याने यकृताचे दान झाले. न्यू इरा हॉस्पिटलमधील ३९वर्षीय पुरुषाला या अवयवाचे दान करण्यात आले. बिहारमधील व्यक्तीचे नागपुरात अवयवदान झाले.
२४ तासांत चार रुग्णांमध्ये अवयवाचे प्रत्यारोपण‘झेडटीसीसी’ नागपूर अंतर्गत पहिल्यांदाच २४ तासांत दोन ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून अवयवदान झाले. विशेष म्हणजे, याच कालावधीत दोन रुग्णांवर मूत्रपिंड व दोन रुग्णांवर यकृत प्रत्यारोपणाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होण्याचीही पहिलीच घटना आहे. अवयवदानासाठी नातेवाइक पुढे येत असल्याने अवयवदान चळवळीला गती येण्याची शक्यता आहे. -डॉ. संजय कोलते, अध्यक्ष झेडटीसीसी नागपूर