नागपूर : अपघातात डोक्याला जबर मार बसून उपचारादरम्यान ‘ब्रेन डेड’ झालेल्या पतीच्या अयवदानासाठी या असह्य दु:खातही पत्नीने व मुलाने पुढाकार घेऊन समाजापुढे एक आदर्श ठेवला. गडचिरोली येथील या शिक्षकाचे नागपुरात सोमवारी अवयवदान करण्यात आले. यामुळे तिघांना जीवनदान मिळाले तर, दोघांना दृष्टी मिळणार आहे. विशेष म्हणजे, अवयवदान सप्ताहामधील हे अवयवदान मोलाचे ठरले.
दयानंद सहारे (५८, रा. गडचिरोली) असे अवयवदात्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, सहारे हे शिक्षक होते. १३ ऑगस्ट रोजी रस्ता अपघातात ते जबर जखमी झाले.
त्यांना लागलीच नागपूरच्या विम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. डॉक्टरांनी त्यांना अवयवदान करण्याचा सल्ला दिला. त्या दु:खातही त्यांच्या पत्नी वनिता व मुलगा भूपेश सहारे यांनी स्वत:ला सावरत आपल्या व्यक्तीचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाने याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. संजय कोलते यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन को-ऑर्डिनेटर वीणा वाठोडे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार दयानंद सहारे यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंड व बुबूळ दान करण्यात आले.
-हृदयासाठी आला होता चेन्नईचा चमू
दयानंद सहारे यांच्या कुटुंबीयांनी हृदयही दान करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी चेन्नई येथील एमजीएम हेल्थ केअर हॉस्पिटलचा डॉक्टरांचा चमू आला. परंतु प्रत्यारोपणासाठी हृदय चांगल्या स्थितीत नसल्याने त्यांनी पुढील प्रक्रिया थांबवली.
-मूत्रपिंड, यकृतासाठी ग्रीन कॉरिडोर
सहारे यांचे एक मूत्रपिंड न्यू इरा हॉस्पिटल तर एक मूत्रपिंड वोक्हार्ट हॉस्पिटलमधील रुग्णाला दान करण्यात आले. वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडोर करून काही मिनिटात हे अवयव रुग्णालयापर्यंत पोहोचवले. सहा तासात प्रत्यारोपणही पार पडले. यकृत एका खासगी हॉस्पिटलमधील रुग्णाला तर दोन्ही बुबूळ मेडिकलच्या नेत्र बँकेत दान करण्यात आले.
-अवयवदानासाठी या डॉक्टरांचा पुढाकार
अयवदानासाठी डॉ. गिरीश ठाकरे, डॉ. मीनाक्षी हांडे, डॉ. नितीन खंडेलवाल, डॉ. हरी गुप्ता, डॉ. विनय काळबांडे, डॉ. विवेक अग्रवाल व डॉ. राजेश सिंघानिया यांनी सहकार्य केले.