नागपुरातील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी आयोजकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:01 AM2018-04-25T01:01:05+5:302018-04-25T01:01:17+5:30
लाऊडस्पीकर वाजविणारा आयुष भास्कर बगेकर (वय २०) याच्या करंट लागून झालेल्या मृत्यूप्रकरणी नंदनवन पोलिसांनी कार्यक्रमाचा आयोजक हिरालाल पुनियानी (वय ३०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाऊडस्पीकर वाजविणारा आयुष भास्कर बगेकर (वय २०) याच्या करंट लागून झालेल्या मृत्यूप्रकरणी नंदनवन पोलिसांनी कार्यक्रमाचा आयोजक हिरालाल पुनियानी (वय ३०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लकडगंजमधील आदर्शनगर, गरोबा मैदानाजवळ राहणारा आयुष साऊंड सर्व्हिसवाल्याकडे काम करायचा. नंदनवनमधील वाठोडा लेआऊटमध्ये असलेल्या सदाशिव एन्क्लेव्ह सोसायटीत हिरालाल पुनियानी राहतात. २२ एप्रिलला त्यांच्याकडे भजनाचा कार्यक्रम होता. येथे आयुषने लाऊडस्पीकर लावला. कार्यक्रम सुरू असताना आयुष पाणी पिण्याकरिता बाजूला गेला असता त्याला विजेचा जोरदार करंट लागला. त्याला उपचाराकरिता मेयो हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. नंदनवन पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद केली. चौकशीत कार्यक्रमाचे आयोजन करताना आरोपी हिरालाल पुनियानीने निष्काळजीपणा केल्यामुळे आयुषचा करंट लागून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी विजय रामाजी बगेकर (वय ३८) यांची तक्रार नोंदवून घेत पुनयानीविरुद्ध कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला.