पहिल्या इंडियन फायर सर्व्हिस गेम्सचे नागपुरात आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:56 AM2018-02-03T10:56:49+5:302018-02-03T10:58:56+5:30
देशभरातील विविध राज्यात कार्यरत फायर फायटर्सना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी आयोजित देशातील पहिल्या इंडियन फायर सर्व्हिस गेम्स २०१८चे शुक्रवारी थाटात उद््घाटन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरातील विविध राज्यात कार्यरत फायर फायटर्सना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी आयोजित देशातील पहिल्या इंडियन फायर सर्व्हिस गेम्स २०१८चे शुक्रवारी थाटात उद््घाटन झाले. विभागीय क्रीडा संकुल, कोराडी मार्ग येथे शुक्रवारी हा कार्यक्रम झाला. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे आयोजन देशात प्रथमच करण्यात आले असून आयोजनाचा मान नागपूरला मिळाला आहे, हे उल्लेखनीय.
स्पर्धेचे उद््घाटन सिव्हिल डिफेन्स/ होम गार्ड महासंचालक प्रकाश मिश्रा यांच्या हस्ते झाले. यावेळी उत्तर प्रदेश फायर सर्व्हिसचे संचालक पी.के. राव, एअरपोर्ट अॅथारिटी आफ इंडियाचे महाव्यवस्थापक सुभाष कुमार, नॅशनल फायर सर्व्हिस महाविद्यालयाचे संचालक शमिम, अतिविशिष्ट सेवा मेडलप्राप्त व नॅशनल फायर सर्व्हिस महाविद्यालयाचे प्रशासकीय संचालक डॉ. जी.एस.सैनी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशभरातील सुमारे दोन हजारावर फायर फायटर्स दाखल झाले आहते. यामध्ये अॅथ्लेटिक्स, बॅडमिंटन, टेबलटेनिस, फुटबॉल, व्हॉलिबॉल, अल्टीमेंट फायर फायटर्स अलाईव्ह, टग आफ वार, आर्म व्हेसलिंग, फायर फायटिंग अॅन्ड रेस्क्यू कॅम्पिटिशन, रोप रेस्क्यू कॅम्पिटिशन, फायर फायटिंग ड्रिल, पंप ड्रिल (४ व्यक्ती), बीए सेट ड्रिल आदी स्पर्धा होणार आहे. स्पर्धांचे आयोजन नॅशनल फायर सर्व्हिस महाविद्यालय व नॅशनल फायर सर्व्हिस गेम्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.