नागपूर : मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२४ अंतर्गत ४, ५, २५ व २६ नोव्हेंबर या चार दिवशी नागपूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.या नोंदणी शिबिरामध्ये मतदार नोंदणीविषयक कामे केली जातील. नागपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी विहीत नमुना अर्ज भरून मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत २७ ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्व ४ हजार ४७४ मतदान केंद्रावर मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादी शुद्धीकरण करण्याच्या दृष्टीने २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर या कालावधीमध्ये नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे, मतदार यादी मधील नोंदीच्या दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. या अंतर्गत अधिकाधिक नागरिकांनी मतदार नोंदणी करावी यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे आयोगाने निर्देश आहेत.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदार यादीसह हजर राहणार आहेत. तसेच, शिबिरामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडून मतदार नोंदणीची कामे, मतदार यादीतील नाव व इतर दुरुस्ती व मतदार यादीमधील नावे वगळण्याची कामे केली जाणार आहेत.