मेयो-मेडिकलमध्ये अत्यावश्यक सोडल्यास इतर ऑपरेशन टाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:08 AM2021-06-24T04:08:30+5:302021-06-24T04:08:30+5:30
नागपूर : परिचारिकांनी बुधवारी काम बंद ठेवून आंदोलन केले. त्यामुळे शहरातील सरकारी रुग्णालय मेयो व मेडिकलमध्ये अत्यावश्यक सोडल्यास सर्व ...
नागपूर : परिचारिकांनी बुधवारी काम बंद ठेवून आंदोलन केले. त्यामुळे शहरातील सरकारी रुग्णालय मेयो व मेडिकलमध्ये अत्यावश्यक सोडल्यास सर्व ऑपरेशन टाळण्यात आले. परिचारिकांच्या आंदोलनामुळे रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने महत्वाचे ऑपरेशन करण्याचे निर्देश दिले होते. पण अत्यावश्यक सोडून ज्या रुग्णांचे ऑपरेशन होणार होते, त्यांना परत वाॅर्डात पाठविण्यात आले. त्याचबरोबर मेयो-मेडिकलमध्ये ओपीडी व वाॅर्ड बरोबरच ओटीमधील वैद्यकीय सेवा प्रभावित झाली होती.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने केलेल्या आवाहनानुसार राज्यभरात परिचारिका गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन करीत आहे. यामध्ये मेयो व मेडिकलमधील पारिचारिकांचाही समावेश आहे. शंभर टक्के स्थायी पदभरती करावी, अधिसेविका, पाठ्यनिर्देशिका आदीचे रिक्त पदे भरावी, अतिरिक्त बेडसाठी नवीन पदभरती करावी, परिचारिकांना नर्सिंग भत्ता द्यावा, कोविड मध्ये बंद केलेली साप्ताहिक सुटी देण्यात यावी, परिचारिकांना केवळ उपचारासंदर्भातीलच कामे द्यावी, आदी मागण्या संघटनेच्या आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास २५ जूनपासून बेमुदत कामबंद आंदोलनाची घोषणा संघटनेने केली.
- रुग्णालय प्रशासनाची वाढली चिंता
परिचारिकांच्या काम बंद आंदोलनामुळे मेयो-मेडिकल प्रशासनाची चिंता वाढली आहे. मेडिकलचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे म्हणाले की, परिचारिकांच्या कामबंद आंदोलनामुळे रुग्ण सेवा प्रभावित झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक ऑपरेशन सोडून अन्य ऑपरेशनला ब्रेक दिला आहे. अपेक्षा आहे समस्या लवकर सुटेल. इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) चे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया म्हणाले की रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. मात्र काही अतिरिक्त परिचारिकांच्या सहकार्याने अत्यावश्यक ऑपरेशन करण्यात आले आहे. काही ऑपरेशन आम्हीही थांबविले आहे.