नागपूर : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी शुक्रवारी निवडणूक झाली. यात महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. त्यानंतर, आता राजकीय नेते एकमेकांवर टीकेचे बाण सोडत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठरल्यप्रमाणेच मतदाने केले. मात्र, आम्हाला काही अपक्षांची मतं मिळाली नाहीत तसेच, एक मत अवैध ठरले. आमचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता आले नाही. या सर्वांकडे बघता फार मोठा फटका बसलेला नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादीकडे ५१ मते होती, त्यात एकही मताचं फरक पडला नाही. हे मी अधिृतपणे सांगू शकतो. आमच्या आमदारांनी ठरल्याप्रमाणे मतदान केले. माझ्यावर प्रेम असणाऱ्या कुणीतरी एकाने मला एक मत जास्त दिलं. परंतु. काही अपक्ष आमदारांनी आम्हाला मतं दिली नाहीत. ठरल्यानुसार काही मत संजय पवारांना दिले होते. तीन पक्षाच्या सरकारमध्ये मतभेद होऊ शकतात. ते एका पक्षाच्या सरकारमध्येही होते. नागपुरात काय सुरू आहे, सर्वांना माहिती आहे, असे पटेल म्हणाले.
काही लोकांची प्रवृत्ती वेगळी असू शकते, त्यासाठी खोलात जावं लागेल. या सर्वांच विष्लेषण होणार आहे. सकाळी चारपर्यंत मतमोजणी सुरू होती त्यामुळे, सगळ्या बाबींचा तपशील होऊ शकला नाही. आम्ही सर्व गोष्टींचा विचार करू, कुठे काय झाले. आम्हाला अपक्षांची चार ते पाच मत का मिळाली नाही. तीन ते चार दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल. घाई करण्याची गरज नाही, असही त्यांनी स्पष्ट केलं.