नागपूर : गेल्या वर्षीपासून जगभरात थैमान घातलेल्या काेराेना महामारीला एक वर्षापेक्षा जास्त कलावधी झाला आहे. गेल्यावर्षी आलेल्या पहिल्या लाटेपेक्षा यावर्षीच्या दुसऱ्या लाटेने भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. दरम्यान, पहिली लाट काहीशी ओसरल्यानंतर मिळालेल्या तीन-चार महिन्यांच्या कलावधीत नागरिकांनी लग्न समारंभासह इतर काैटुंबिक कार्यक्रमांचा आनंद लुटला. काेराेनाला वाकुल्या दाखवत मंगल कार्यालये व घरगुती मिळून शहरात ५००० च्यावर लग्नाचे बार उडाले.
गेल्या वर्षी काेराेनाचा प्रकाेप वाढला तसा २५ मार्चपासून संपूर्ण देशात लाॅकडाऊनची घाेषणा करण्यात आली. तेव्हापासून सर्व बंद झाले ते मे पर्यंत. त्यानंतर अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाली पण परिस्थिती सुधारली नाही. सप्टेंबरमध्ये उच्चांक गाठल्यानंतर काहीसा प्रकाेप ओसरला आणि पुन्हा पूर्ववत सुरू झाले. मात्र लग्नसराईचा पूर्ण काळ यात वाया गेला. मात्र प्रकाेप जसा कमी झाला तशी रखडलेले लग्न समारंभ आटाेपण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न चालविले. मात्र परिस्थिती पूर्णपणे सुधारली नसल्याने बंधने कायम हाेतीच. मंगल कार्यालय व घरी कार्यक्रम घेतानाही केवळ ५० वऱ्हाड्यांच्या उपस्थितीची अट ठेवण्यात आली हाेती. काहींनी ती पाळली तर अनेकांनी धुमधडाका केला. शहरात जवळपास २५० मंगल कार्यालये आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नाेव्हेंबर-डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या चार महिन्याच्या काळात या मंगल कार्यालयांमध्ये प्रत्येकी २०.............................. च्या आसपास लग्न लागली. असे एकूण ५००० च्या जवळपास लग्न समारंभ आटाेपले. अनेकांनी आपल्याच घरी लग्न समारंभ आटाेपते घेतले पण उत्साह ताेच हाेता. काही लाेकांनी धार्मिक स्थळीही लग्न आटाेपल्याचे सांगण्यात येत आहे.
- दाेन लाटेदरम्यान ७१ मुहूर्त
काेराेनाच्या प्रकाेपात गेल्या वर्षी मार्चपासून सप्टेंबरपर्यंतचा काळ लाेटला. ज्याेतिषाचार्यानुसार नाेव्हेंबर व डिसेंबर २०२० मध्ये अनुक्रमे २ आणि ८ मुहूर्त हाेते. जानेवारी २०२१ मध्ये ११, फेब्रुवारीमध्ये ८, मार्चमध्ये ९ तर एप्रिलमध्ये ८ तारखा आहेत. गेल्या वर्षी काेराेना प्रकाेपात गेलेल्या जुलैमध्ये ११, ऑगस्टमध्ये ६ व ऑक्टाेबरमध्ये ८ मुहूर्त हाेते. पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान असे एकूण ७१ मुहूर्त हाेते.
- चार महिन्यात १३०० च्यावर रजिस्टर्ड शुभमंगल
नाेंदणी कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार २०२१ च्या जानेवारीपासून आतापर्यंत १३६७ रजिस्टर्ड शुभमंगल पार पडले. जानेवारीत ४६०, फेब्रुवारीत ४८२, मार्चमध्ये २७४ तर एप्रिल महिन्यात आतापर्यंत १५१ जाेडप्यांनी नाेंदणी विवाह उरकले. गेल्या वर्षा ऑक्टाेबर ते डिसेंबरदरम्यान ४५० च्या आसपास नाेंदणी विवाह झाल्याची माहिती आहे.
- एप्रिल कठीणच
दरम्यान, एप्रिल महिन्यात १५१ नाेंदणी विवाह वगळता घरगुती विवाह झाल्याची नाेंद नाही. आतापर्यंत २ लग्नतारखा हाेत्या. ज्याेतिषाचार्यानुसार येत्या २४, २५, २६, २८, २९ व ३० तारखेला विवाहाचे मुहूर्त आहेत. मात्र शहरात काेराेनाची भीषण परिस्थिती पाहता काेणीही लग्न समारंभ करण्यास पुढे येईल, ही शक्यता दिसत नाही.
नाेव्हेंबरपासून मंगल कार्यालयात लग्न समारंभ करायचा परवानगी मिळाली पण ५० पाहुण्यांची अट हाेती. ही अट वाढवावी म्हणून सरकारही सकारात्मक हाेते. मात्र परिस्थिती पुन्हा चिघळली. अनेक तारखांचे पैसे परत करावे लागले. यावर्षीतरी लग्नसराईच्या काळात आर्थिक घडी सुधारेल अशी आशा हाेती पण दुसऱ्या लाटेने ती धुळीस मिळाली.
- उमाकांत जट्टेवार, अध्यक्ष, मंगल कार्यालय असाेसिएशन
आजच्या तारखेला २५ च्या उपस्थितीत लग्नकार्य करण्याला परवानगी आहे पण भीषण परिस्थितीत ते शक्य नाही. शिवाय मंगल कार्यालयाचे कर्मचारी व कॅटरर्सपर्यंत सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक आहे. यासह अनेक अटी आहेत, त्या पूर्ण करणे अशक्य असून त्यापेक्षा मंगल कार्यालये बंद ठेवणे अधिक चांगले. हा मंगल कार्यालय चालकांसाठी सर्वांत वाईट काळ आहे. अनेकांचे व्यवसाय काेलमडण्याची भीती आहे.
- संजय काळे, सचिव, मंगल कार्यालय असाेसिएशन