महिलांविरोधातील सामाजिक कुप्रथा उखडून फेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:30 PM2018-01-27T22:30:01+5:302018-01-27T22:38:08+5:30
‘तिहेरी तलाक’ पद्धतीला अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये बंदी आहे किंवा त्यात बदल तरी करण्यात आले आहे. परंतु आपल्या देशात सामाजिक कुप्रथांविरोधात आवाज उठवला की लगेच धार्मिक व सामाजिक मुद्दे उपस्थित करून त्याला विरोध होतो. परंतु आता महिलांविरोधातील सामाजिक कुप्रथा उखडून फेकण्याची वेळ आली आहे व त्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन मुस्लिम महिला आंदोलनकर्त्या शायरा बानो यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘तिहेरी तलाक’ पद्धतीला अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये बंदी आहे किंवा त्यात बदल तरी करण्यात आले आहे. परंतु आपल्या देशात सामाजिक कुप्रथांविरोधात आवाज उठवला की लगेच धार्मिक व सामाजिक मुद्दे उपस्थित करून त्याला विरोध होतो. परंतु आता महिलांविरोधातील सामाजिक कुप्रथा उखडून फेकण्याची वेळ आली आहे व त्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन मुस्लिम महिला आंदोलनकर्त्या शायरा बानो यांनी केले. भारतीय स्त्रीशक्तीतर्फे नागपुरात २७ जानेवारीपासून दोन दिवसीय त्रिदशकपूर्ती राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित या अधिवेशनाला राज्यसभा खासदार संपतिया उईके, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, महापौर नंदा जिचकार, अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष कांचन गडकरी, आरोग्यतज्ज्ञ डॉ.प्रभा चंद्रा, स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयश्री के.एस., सचिव कुमुदिनी भार्गव, अधिवेशन प्रमुख हर्षदा पुरेकर या प्रामुख्याने उपस्थित होत्या.‘तिहेरी तलाक’ हा महिलांचे शोषण करणाराच प्रकार होता. अशा अनेक कुप्रथा समाजात अस्तित्वात आहे. मुळात ‘तलाक’चा अधिकार पुरुषांनाच का, असा प्रश्न यावेळी बानो यांनी उपस्थित केला. महिलांच्या मौलिक अधिकारांचे संवर्धन व्हायला हवे. ‘तिहेरी तलाक’ पद्धती हद्दपार केल्याबाबत केंद्र सरकारचे मुस्लिम महिलांनी आभारच मानायला हवे, असे बानो म्हणाल्या. अनेक वर्षांपासून पुरुषप्रधान संस्कृतीमुळे महिलांचे दमन झाले. मात्र आता त्यांना आरक्षणामुळे नेतृत्वाची संधी मिळाली आहे. या संधींचा उपयोग करण्यासाठी आपण तयार आहोत का, याचे महिलांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. राजकीय क्षेत्रातील महिलांना तर आणखी तयारीची आवश्यकता आहे. अनेक महिला शिकतात. मात्र शिक्षणाचा त्या योग्य उपयोग करतीलच असे नाही. महिला पूर्णपणे स्वावलंबी झाल्या नसल्याचे चित्र आहे, असे प्रतिपादन नंदा जिचकार यांनी केले.
यावेळी डॉ. प्रभा चंद्रा यांचा ‘वाटी’ राष्ट्रीय पुरस्कार व सन्मानपत्र देउन सत्कार करण्यात आला. स्त्री शक्तीच्यावतीने काढण्यात आलेल्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. अधिवेशनाला देशभरातून १२०० हून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत. कुमुदिनी भार्गव यांनी प्रास्ताविक केले. रागिणी चंद्रात्रे यांनी संचालन केले तर हर्षा पुरेकर यांनी आभार मानले.