लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुडकेश्वर येथील पिपळा घाट मार्गावर करंट लागून एका पेंटरचा मृत्यू झाला. पेंटरचा मृतदेह जवळपास पाऊणतास विजेच्या ताराला लटकून असल्याने परिसरात दहशत पसरली.शैलेश भांडारकर (४२) रा. चंदन शेषनगर असे मृताचे नाव आहे. शैलेश पेंटिंगचे काम करीत होतो. तो गणेश राऊत यांच्या घरी दुपारी १२.१५ वाजता पेंटिंग करीत होता. इमारतीला बाहेरून पेंट करण्यासाठी तो झुल्यावर चढू लागला. त्याचवेळी वीजतारांच्या संपर्कात आल्याने त्याला करंट लागला. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. नागरिकांनी पोलीस आणि वीज विभागाला कळविले. वीजपुरवठा बंद करण्यात आला. हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह खाली उतरविला. शैलेशच्या कुटुंबात पत्नी आणि तीन मुले आहेत. हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. २४ तासाच्या आत करंट लागून मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. रविवारी भांडेवाडी डम्पिंग यार्डच्या वॉटर फिल्टर पंपमध्ये करंट लागून एका १४ वर्षीय जगत विनोद निंबर्ते नावाच्या मुलाचा मृत्यू झाला होता.
नागपुरात करंट लागून पेंटरचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:54 PM