लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन यावेळी साधेपणाने साजरा होत आहे. दोन दिवसीय या कार्यक्रमाला आज शनिवारपासूनपासून सुरुवात झाली.
दीक्षाभूमीवर दरवर्षी मुख्य सोहळ्याच्या एक दिवसाअगोदर पंचशील ध्वजारोहण केले जाते. आज सकाळी ९ वाजता पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलातर्फे पंचशील ध्वजास मानवंदना अर्पण करण्यात आली.
यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, भदन्त नाग दिपांकर, सचिव डॉ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, एन.आर. सुटे आदी उपस्थित होते.
दीक्षाभूमीवर पूर्ण होणार अनुयायांची साहित्यिक भूक :१५ हजार ग्रंथ वितरित होणार
दीक्षाभूमीच्या धम्मदीक्षा साोहळ्यात मुख्य आकर्षण असते ती ग्रंथसंपदा. आंबेडकरी अनुयायांमध्ये असलेली साहित्यिक भूक दीक्षाभूमीवर भागवली जाते. याावेळी सोहळ्यावरच कोरोनाचे सावट असल्याने येथे येणारे लाेकं पुस्तकांपासून वंचित राहतील की काय, अशी शंका होती. मात्र काही संस्थांनी पुढाकार घेत पुस्तकांची भूक पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनियर्स असोसिएशनने दरवर्षीप्रमाणे यंदाही धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. यंदा बानाईतर्फे १५ हजार ग्रंथ वितरित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दीक्षाभूमीवर अशोक विजयादशमीनिमित्त आयोजित धम्मदीक्षा सोहळ्याचा मुख्य सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दीक्षाभूमीवर दरवर्षीप्रमाणे गर्दी होणार नाही. याचा सर्वाधिक फटका पुस्तक विक्रीला बसणार आहे. एकट्या दीक्षाभूमीत दोन दिवसात कोट्यवधी रुपयांच्या पुस्तकांची विक्री होते. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचा समावेश असतो. देशभरातील गावखेड्यातून येणारे अनुयायी या ग्रंथाची एक तरी प्रत सोबत घेऊन जातात. त्यामुळे यंदा कार्यक्रमच होणार नसल्याने पेंडाॅलही लागणार नाही. यामुळे पुस्तक प्रेमींची मोठी निराशा होणार आहे. परंतु बानाईने घेतलेल्या संकल्पामुळे ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ अनुयायींना सवलतीत यंदाही उपलब्ध होणार ही आनंदाची बाब आहे.
जनजागृतीही करणार
बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लोकांच्या घराघरात पोहोचावा याउद्देशाने बानाई गेल्या ११ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. यंदाही तो राबवला जाईल. यावेळी स्वरुप बदललेले असेल. दीक्षाभूमीवर गर्दी करता येणार नाही. परंतु दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांनाही ग्रंथ मिळावा म्हणून तशी व्यवस्था केली जाईल.
पी.एस. खोब्रागडे
बानाई अध्यक्ष