विरोधाच्या नावावर पानतावणेंचा छळ झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:10 PM2018-03-28T23:10:02+5:302018-03-28T23:10:14+5:30
डॉ. गंगाधर पानतावणे यांचा लहान भाऊ सदानंद हा संंघाचा स्वयंसेवक होता यात पानतावणेंचा काय दोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत: रिपब्लिकन पक्ष हा एका जातीचा असू नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या अपेक्षेला अनुसरून पानतावणेंनी कार्य केले तर ते संघाचे समर्थक कसे ठरतात, असा सवाल उपस्थित करून समाजातील काही तथाकथित विचारवंतांनी विरोधाच्या नावावर पानतावणेंचा अक्षरश: छळ केला, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. गंगाधर पानतावणे यांचा लहान भाऊ सदानंद हा संंघाचा स्वयंसेवक होता यात पानतावणेंचा काय दोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत: रिपब्लिकन पक्ष हा एका जातीचा असू नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या अपेक्षेला अनुसरून पानतावणेंनी कार्य केले तर ते संघाचे समर्थक कसे ठरतात, असा सवाल उपस्थित करून समाजातील काही तथाकथित विचारवंतांनी विरोधाच्या नावावर पानतावणेंचा अक्षरश: छळ केला, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम यांनी व्यक्त केली. विदर्भ साहित्य संघ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने विदर्भ साहित्य संघाच्या चौथ्या माळ्यावरील सभागृहात बुधवारी आयोजित डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या आदरांजली सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी तर प्रमुख वक्ते म्हणून दलित साहित्याचे अभ्यासक ताराचंद्र खांडेकर व भाऊ लोखंडे उपस्थित होते. मेश्राम पुढे म्हणाले, पानतावणेंच्या विरोधकांनी केवळ व्यक्ती म्हणून पानतावणेंनाच नाही तर त्यांच्या अक्षर कर्तृत्वाला संपवण्याचा प्रयत्न केला. पण, पानतावणेंची अंगभूत सहनशीलता कमालीची होती. चौफेर होणारा विरोध पचवून त्यांनी माणूसमुक्तीचा वसा घेतलेल्या आंबेडकरी तत्त्वज्ञानाला समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्याचे कार्य नेटाने केले. ताराचंद्र खांडेकर म्हणाले, पानतावणे आणि माझा परिचय तेव्हाच्या मॉरिस कॉलेजमध्ये झाला. ते मला दोन वर्ष सिनिअर होते. परंतु आमच्यात छान मैत्री होती. केवळ मैत्रीने नाही तर आंबेडकरांच्या विचारांनी आम्हाला परस्परांशी जोडले होते. पानतावणेंचे वैचारिक कार्य संक्रमणाच्या काळात सुरू झाले. भूतकाळाचे चटके दलित समाज विसरला नव्हता आणि तिकडे बाबासाहेबांनी एक नवा विचार तरुण दलित पिढीपुढे ठेवला होता. पानतावणेंनी हा विचार स्वीकारला आणि अवघे आयुष्य त्याला समर्पित करून टाकले. यावेळी भाऊ लोखंडे यांनीही पानतावणेंसोबतच्या चळवळीतील आठवणींचा पट उलगडला. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात पानतावणेंनी स्वत:च्या अस्मितेची ओळख करून देणारा आरसा आपल्या विचारातून समाजासमोर ठेवल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. इंद्रजित ओरके यांनी केले.