लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांद्वारे शासकीय नियमांचे उल्लंघन करून अवैध मार्गाने पालकांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क उकळले जात आहे. शाळांच्या मनमानीमुळे पर्याय नसलेल्या पालकांना हा हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. याविरोधात पालकांमध्ये असंतोष वाढत आहे. हा असंतोष व्यक्त करण्यासाठी पालकांनी बुधवारी मशाल मोर्चा काढून शाळांच्य शुल्कवाढीचा निषेध केला. जागरूक पालक समितीच्या माध्यमातून प्रतापनगर ते माटे चौक व परत प्रतापनगरपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील खासगी शाळा पीडित शेकडो पालक सहभागी झाले होते. समितीच्या डॉ. प्रियंका हाडके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, दिल्ली आणि देशातील काही राज्यात चांगल्या दर्जाचे शिक्षण तेथील शासनाकडून मोफत किंवा कमी पैशात दिले जात आहे. महाराष्ट्रात मात्र पालकांना शाळांची भरमसाट फीचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. शासकीय नियमानुसार ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर सामाजिक भावनेतून शाळा चालविण्यासाठी शासनाकडून परवानगी घेतली जाते. मात्र ही सामाजिक भावना बाजूला ठेवून आज शाळांनी व्यवसाय सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. या शाळा १५ ते २० हजार फी घेउन आरामात चालवू शकतात. मात्र शाळा व्यवस्थापनाद्वारे पुस्तके, गणवेश आदींच्या नावाने ४० ते ५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक शुल्क वसूल केले जात आहे. शाळांच्या या मनमानीमुळे पालक हतबल झाले आहेत. असेच सुरू राहिले तर पालकांवरही आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा रोष व्यक्त करीत यासाठी राजकीय अनास्था कारणीभूत असल्याची टीका डॉ. हाडके यांनी केली. याविरोधात पालकांना जागृत करण्यासाठी मशाल मोर्चा काढण्यात आला. यामध्ये ३०० च्यावर पालक सहभागी झाले. यवतमाळ येथून २०० पालक समितीशी जुळले असून यातील काही सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. वार्षिक फी १८ ते २० हजार असावी, शासकीय नियमानुसार पीटीएला विश्वासात घेऊन फी वाढ करावी, केवळ शासनाने निर्धारीत केलेली किंवा एनसीईआरटीची पुस्तके शाळांमध्ये अनिवार्य करावी, आदी मागण्या याद्वारे करण्यात येत आहेत. मोर्चा आयोजनात चित्रलेखा नायडू, अमोल हाडके, योगेश पाथरे, गिरीश पांडे, अमोल फाये, स्मिता काजने, स्वरेषा दमके, मंगला गजभिये, अर्चना देशपांडे, मयुरी टेंभुर्णे आदींचा सहभाग होता.
शाळांच्या शुल्क वाढीविरोधात पालकांमध्ये असंतोष : मशाल मोर्चा काढून केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:18 PM
राज्यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांद्वारे शासकीय नियमांचे उल्लंघन करून अवैध मार्गाने पालकांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क उकळले जात आहे.
ठळक मुद्देजागरूक पालक समितीचे अभियान