लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : योगामुळे शरीर निरोगी राहते. कुठलेही आजार जडत नाहीत. त्यामुळे समाजाला रोगमुक्त करण्यासाठी अॅड. नामदेव फटिंग यांनी स्वामी रामदेवबाबा यांच्याकडे दीक्षा घेतली. पतंजलीयोग समितीच्या माध्यमातून नागपूर शहर आणि जिल्ह्यात योगाचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी दोन हजार सहयोग शिक्षक तयार केलेत. त्यांच्या माध्यमातून नागपूर शहरात २५० आणि जिल्ह्यात २५० ठिकाणी असे ५०० नियमित योग वर्ग सुरू आहेत. या योग वर्गाच्या माध्यमातून नामदेव फटिंग यांनी आजवर लाखो नागरिकांना योगाचे धडे देण्याचे कार्य अविरतपणे केले आहे.स्वामी रामदेवबाबा यांनी २००५ मध्ये आस्था चॅनलवर योग शिक्षक नेमावयाचे असल्याची जाहिरात दिली होती. अर्ज करणाऱ्या व्यक्तींना तो सेवानिवृत्त असावा, त्याला कुठलाही आजार नको, त्याचे वजन जास्त नको अशा अटी ठेवण्यात आल्या होत्या. अॅड. नामदेव फटिंग आणि त्यांचे सहकारी प्रभाकर सावळकर हे दोघेही या अटींची पूर्तता करीत असल्यामुळे त्यांनी योग शिक्षकासाठी अर्ज केला. सप्टेंबर २००५ मध्ये रामदेवबाबांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यानंतर ११ दिवसांचे प्रशिक्षण झाले आणि अखेरच्या दिवशी त्यांना दीक्षा देण्यात आली. दीक्षा दिल्यानंतर त्यांना आपल्या जिल्ह्यात नि:शुल्क योग वर्ग घेण्यास सांगण्यात आले. त्यावर पहिल्यांदाच ऑक्टोबर २००५ मध्ये दत्तात्रयनगर येथील संत ज्ञानेश्वर उद्यानात योग वर्ग सुरू करण्यात आला. आज या योग वर्गाला १५ वर्षांचा कालावधी झाला असून आजही या उद्यानात नागरिकांना नियमितपणे योगाचे धडे देण्यात येतात. पतंजली योग समितीच्या माध्यमातून योगाचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी दोन हजार योग शिक्षक तयार केलेत. त्यांच्या माध्यमातून सध्या नागपूर शहरात विविध उद्याने, संस्था, शाळांमध्ये २५० नियमित योग वर्ग सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यातही सहयोग शिक्षकांच्या माध्यमातून २५० च्यावर योग वर्ग सुरू आहेत. आजपर्यंत लाखो नागरिकांना योगाचे धडे देऊन रोगमुक्त करण्याचे कार्य अॅड. नामदेव फटिंग यांनी केले आहे. योग समाजातील अखेरच्या घटकापर्यंत पोहोचावा, त्यासाठी त्यांनी जागृती केली. हजारो नागरिकांचे आजार योगाच्या माध्यमातून बरे करण्याचे कार्य त्यांनी केले. प्राणायामाने शरीर निरोगी राहत असून कुठलेही औषध घेण्याची गरज नाही. त्यामुळे नागरिकांनी सकाळी केवळ एक तास योग करून आपले आरोग्य सुदृढ ठेवण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने नामदेव फटिंग यांनी केले.अखेरच्या श्वासापर्यंत योगाचा प्रचार-प्रसार करणार : फटिंगडाकलेखा विभागातून सहायक लेखा अधिकारी पदावरून निवृत्त झाल्यानंतर २००३ मध्ये नामदेव फटिंग हे योगाकडे वळले. त्यानंतर स्वामी रामदेवबाबांकडे दीक्षा घेऊन त्यांनी योगाच्या प्रचार-प्रसाराचे कार्य सुरू केले. आज त्यांचे वय ७७ वर्षांचे झाले आहे. योगामुळे समाज निरोगी राहतो. त्यामुळे अखेरच्या घटकापर्यंत योग पोहोचविण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. भविष्यात बंद पडलेल्या योगवर्गांचे पुनरुज्जीवन करणार असून अखेरच्या श्वासापर्यंत योगाचा प्रचार-प्रसार करीत राहीन, असे मनोगत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.