लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘यूपीएससी’च्या परीक्षेत नागपुरातील सात उमेदवारांनी यश संपादित केले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कठोर मेहनत, एकाग्रता व त्याग यातूनच त्यांनी हे यशोशिखर गाठले. जवळपास सर्वच भावी प्रशासकीय, पोलीस अधिकारी हे मध्यमवर्गीय कुटुंबातील असून समाजातील नेमक्या समस्यांची त्यांना जाण आहे. त्यामुळेच हे अधिकारी पुढे जाऊन समाजात परिवर्त़न आणतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
विना कोचिंग किराणा दुकानदाराच्या मुलाची यशोभरारी
अखिल भारतीय पातळीवर २६६ वी रँक मिळविणाऱ्या संकेत वाघे याचे महाविद्यालयीन शिक्षण नागपुरातील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे झाले. फिजिक्समध्ये एमएस्सी झाल्यावर २०१८ सालापासून त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली. विविध स्पर्धांमध्येदेखील त्याने चमक दाखविली होती. २०१५ ते २०१८ या कालावधीत तो रामकृष्ण मठात विद्यार्थी समन्वयकदेखील होता व तेथील छात्रावासात तो राहायचा. अतिशय जवळून संघर्ष पाहिलेल्या संकेतचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ९३ व्या वर्धापनदिनी ‘बेस्ट स्टुडंट’ पुरस्काराने सन्मानदेखील करण्यात आला होता. संकेतने कुठल्याही कोचिंगशिवाय हे यश मिळविले आहे. संकेतचे वडील किराणा दुकानदार असून आई गृहिणी आहे. संकेतला ‘आयएएस’चे पद मिळेल अशी आशा आहे. महाराष्ट्रातच सेवा करण्याचा त्याचा मानस असून तोच पहिला पर्याय दिला आहे.
डेंटिस्ट दीक्षाच्या मेहनतीला यश
मूळची यवतमाळ येथील डॉ. दीक्षा भवरेने पारंपरिक पठडीच्या बाहेर जात यूपीएससीमध्ये यश मिळविले. व्हीएसपीएम डेंटल कॉलेज येथून बीडीएस केल्यानंतर दीक्षाने अगोदर एमपीएससी व त्यानंतर यूपीएससीची तयारी केली. महाविद्यालयीन जीवनात तिने प्रशासकीय सेवेचा विचार केला नव्हता. मात्र विविध शिबिरांच्या माध्यमातून सामाजिक वर्तुळात वावरताना प्रशासकीय अधिकारी समाजात किती बदल आणू शकतात हे तिने पाहिले व त्यानंतर तयारी सुरू केली. बुटीबोरी येथे निवास असलेल्या दीक्षाची अखिल भारतीय रँक ६६४ असून तिला ‘आयपीएस कॅडर’ मिळण्याचा विश्वास आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबातील पीयूषचे यश
एरवी अभियांत्रिकीची पदविका मिळाली की विद्यार्थी रोजगार कसा मिळेल यावर जास्त भर देतात. मात्र नागपुरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी असलेल्या २८ वर्षीय पीयूष सुधाकर मडके याने जिद्दीतून यश खेचून आणले. सरस्वती विद्यालय येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पीयूषने वायसीसीईमधून अभियांत्रिकीची पदविका घेतली व त्यानंतर अमरावतीतील राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली. सामाजिक कार्याशी अगोदरपासूनच जुळल्यामुळे पीयूषला प्रशासकीय सेवेत रस निर्माण झाला. त्यानंतर त्याने तयारीला सुरुवात केली. त्याला यूपीएससीमध्ये ७३२ वी रँक मिळाली असून ‘आयआरएस’ मिळेल अशी त्याला अपेक्षा आहे. मात्र पुढील वर्षी परत ‘आयएएस’साठी तयारी करण्याचा निर्धार पीयूषने व्यक्त केला.
नोकरी सोडून केली परीक्षेची तयारी
केमिकल अभियांत्रिकीमध्ये एमटेकची पदवी घेतल्यानंतर श्रीकांत मोडकने एका संस्थेत काही काळ नोकरी केली. मात्र यूपीएससीचे स्वप्न शांत बसू देत नव्हते. त्यामुळे अखेर नोकरी सोडली व ‘यूपीएससी’च्या तयारीला सुरुवात केली. श्रीकांतला पाचव्या प्रयत्नात यश मिळाले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील श्रीकांतने नागपुरातील ‘आयएएस पूर्व प्रशिक्षण केंद्रातून मार्गदर्शन घेतले व नागपुरातूनच अभ्यास केला.