फुफ्फुसाच्या कॅन्सरचे रुग्ण वाढताहेत
By admin | Published: February 28, 2017 01:55 AM2017-02-28T01:55:46+5:302017-02-28T01:55:46+5:30
हवेतील प्रदूषण व धूम्रपानाच्या वाढत्या सवयीमुळे फुफ्फुसाच्या आजारात वाढ झाली आहे.
मेडिकल : क्षय व ऊररोग विभागातील धक्कादायक आकडेवारी
सुमेध वाघमारे नागपूर
हवेतील प्रदूषण व धूम्रपानाच्या वाढत्या सवयीमुळे फुफ्फुसाच्या आजारात वाढ झाली आहे. याला घेऊन मेडिकलच्या क्षय व ऊररोग विभागाने रुग्णांच्या नोंदी ठेवणे सुरू केले आहे. विभागाला जून ते डिसेंबर २०१६ या सहा महिन्यांत उपचारासाठी आलेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. तब्बल ४४ कॅन्सर रुग्णांची नोंद झाली असून या धक्कादायक आकडेवारीला घेऊन वरिष्ठ डॉक्टर आश्चर्य व्यक्त करीत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार जगात फुफ्फुसाच्या आजाराने भारतात सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो. एक लाख लोकांमध्ये १२६.९९ लोकांचा मृत्यू होतो. महाराष्ट्रातही याचे प्रमाण मोठे आहे. आता विदर्भातही याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मेडिकलच्या क्षय व ऊररोग विभागात विदर्भासह छत्तीसगड, मध्य प्रदेश व तेलंगणामधून रुग्ण येतात. या विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज २०० वर रुग्ण उपचारासाठी येतात. यातील गंभीर रुग्णांना भरती करून घेतले जाते. जून ते डिसेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत ४०३ रुग्णांना भरती करण्यात आले. यात इतर आजारांच्या तुलनेत २१२ रुग्ण हे क्षयरोगाचे तर त्याच्या खालोखाल ४४ रुग्ण हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे असल्याचे निदान झाले. केवळ सहा महिन्यात एवढ्या मोठ्या संख्येत कॅन्सरचे रुग्ण आढळून आल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
८० टक्के रुग्णांना धूम्रपानाची सवय
फुफ्फुसाच्या कॅन्सरचे निदान झालेल्या ८० टक्के रुग्णांना धूम्रपानाचे व्यसन होते, तर २० टक्के रुग्ण हे धूम्रपान करीत नव्हते. परंतु हवेतील प्रदूषणामुळे त्यांना हा कॅन्सर झाला असावा, असे तज्ज्ञाचे मत आहे. नोंद झालेल्या ४४ कॅन्सरच्या रुग्णांमध्ये ११ महिला व उर्वरित पुरुष आहेत. हे सर्वच रुग्ण हे गंभीर अवस्थेत व शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी आले. यामुळे केवळ केमोथेरपी व रेडिओथेरपीचा सल्ला देण्यात आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
धूम्रपान व प्रदूषण कारणीभूत
फुफ्फुसाच्या कॅन्सरचे मुख्य कारण हे धूम्रपान व हवेतील प्रदूषण आहे. केवळ सहा महिन्यांच्या कालावधीत विभागात ४४ फुफ्फुसाच्या कॅन्सर रुग्णांचे निदान होणे हे आश्चर्यकारक आहे. यामुळे आता ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ आणखी महत्त्वाचे झाले आहे.
-डॉ. एस.व्ही. घोरपडे
क्षय व ऊररोग विभाग, मेडिकल