सुमेध वाघमारेनागपूर : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वसामान्यांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित होते. परंतु नागपूर जिल्ह्यात ६०वर असलेल्या खासगी कोविड हॉस्पिटलमधून अकराच हॉस्पिटल या योजनेशी जुळलेली आहेत. परंतु एकच हॉस्पिटल ही योजना राबवित आहे. एकीकडे बाधितांची संख्या ८० हजारांवर पोहचली असताना दुसरीकडे खासगी हॉस्पिटलमधून केवळ ११३ रुग्णांनाच या योजनेचा लाभ मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दारिद्र्य रेषेखाली व दारिद्र्य रेषेवरील नागरिकांना खासगी हॉस्पिटलमधील आरोग्य सेवा मिळण्यासाठी शासनाच्यावतीने महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना राबविली जाते. परंतु कोरोनाचा या काळात सामान्यांपर्यंत लाभ पोहचण्यासाठी योजनेत सुसूत्रता नसल्याची व त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात ४० रुग्णालयात जनआरोग्य योजना सुरू आहे. यात ९ शासकीय रुग्णालये असून ३१ खासगी रुग्णालये आहेत. परंतु योजनेत समाविष्ट असलेली अकराच खासगी कोविड हॉस्पिटल आहेत. यातील शालिनीताई मेघे हॉस्पिटल, हिंगणा येथे ९९ रुग्णांवर तर श्री भवानी हॉस्पिटलमध्ये केवळ तीन रुग्णांना याचा लाभ मिळाला. यामुळे या योजनेच्या उद्देशावरच पाणी फेरल्याचे दिसून येत आहे.
-योजनेत कोविडशी संबंधित २० पॅकेजजन आरोग्य योजनेत ९९६ उपचारांचा समावेश आहे. यातील कोरोनाशी संबंधित २० उपचाराचे वेगळे पॅकेज तयार करण्यात आले आहेत. साधारण २० ते ८५ हजार रुपयांपर्यंतची यातून मदत मिळते. परंतु खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णावर येणारा खर्च व योजनेतून मिळणारा पैसा फारच कमी असल्याचे सांगत अनेकांनी हात वर केले आहेत. यावर गेल्या आठवड्यात मनपा प्रशासनाने संबंधित खासगी हॉस्पिटलशी दोनदा बैठक घेऊन चर्चा केली, परंतु कुठलाही तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे.
-योजनेचा सर्वाधिक लाभ मेयोतील रुग्णांनाजनआरोग्य योजनेचा सर्वाधिक लाभ मेयोला झाला आहे. ६८३ कोरोनाबाधित रुग्णांवर या योजनेतून उपचार करण्यात आल्याने रुग्णालयाचा मोठा निधी वाचला आहे. मेडिकलमध्ये मात्र योजनेतून ६३ तर एम्समध्ये ६१ रुग्णांवरच उपचार करण्यात आले. आतापर्यंत ८८३ रुग्णांवर या योजनेतून उपचार झाले.-१० खासगी रुग्णालयांना नोटीसमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा समावेश असलेल्या ११ खासगी कोविड हॉस्पिटलमधून एकाच हॉस्पिटलने ही योजना राबवली आहे. यामुळे उर्वरीत १० हॉस्पिटलना नोटीस बजावण्यात आली आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.-डॉ. सय्यद कादीरसमन्वयक, महात्मा फुले जन आरोग्य योजना, नागपूर