लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले हा वैद्यकीय जगतासाठी चिंतेचा विषय आहे. डॉक्टर व रुग्ण संवाद खुंटला की अशा घटना घडतात. असे प्रकार टाळण्यासाठी डॉक्टर व रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये एकमेकांविषयी विश्वास आणि आदर निर्माण होणे आवश्यक आहे. हा विश्वास निर्माण होण्यासाठी संवाद हेच सर्वाधिक प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन डॉ. नितीन वरघणे यांनी केले.शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या अगदतंत्र विभागाच्यावतीने ‘डॉक्टरांविरुद्ध वाढते हिंसाचार रोखण्यासाठी उपाय’ विषयावर डॉ. वरघणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार, डॉ. शमा सूर्यवंशी, संहिता विभाग प्रमुख डॉ. भटकर व कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. राजेंद्र लांबट प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. वरघणे म्हणाले, संवाद खुंटल्यामुळेच डॉक्टरांवरील हल्ले वाढत आहेत. बरेचदा रुग्णालयातील स्टॉफ, नर्सेस किंवा ज्युनियर डॉक्टरांशी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद होतो व त्यामुळे लोकांमध्ये नाराजी निर्माण होते. अशावेळी अनुचित गोष्ट घडली तर नातेवाईकांचा रोष वाढतो व अशा घटना घडतात. त्यामुळे डॉक्टरांनी नेहमी संवाद साधणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. याशिवाय रुग्णांच्या बदलत्या प्रत्येक स्थितीची डॉक्टरांकडून नातेवाईकांना मिळणे आवश्यक आहे. असे झाल्यास लोकांचा विश्वास वाढतो. डॉक्टरांचे कर्तव्य रुग्णांच्या जीवाशी संबंधित असते. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचविणे हे आपले कर्तव्य आहे, अशी प्रामाणिक भावना असावी. वेळ पडल्यास उपचारादरम्यान वरिष्ठांची मदत घेण्यात काही गैर नाही, असे मार्गदर्शन त्यांनी केले.याशिवाय शासनाने डॉक्टरांसाठी रुग्णालयामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करावे, सीसीटीव्ही कॅमेरे लावावे आणि तीन स्तराची सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी, असे आवाहनही डॉ. वरघणे यांनी केले. जमाव घुसणार नाही याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. गणेश मुक्कावार यांनी सुरक्षेबाबतचे मार्गदर्शन समजून भावी डॉक्टरांनी भविष्यात सेवाकार्य करावे, असे आवाहन केले. संचालन मीरा कदम यांनी तर सुप्रिया शेंडे यांनी आभार मानले. अगदतंत्र विभागाचे पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने या व्याख्यानात सहभागी झाले होते.