पीसीआरचा आरोपी कोठडीतून पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:14 AM2021-05-05T04:14:55+5:302021-05-05T04:14:55+5:30

पाचपावलीतील घटना : पोलिसांची दाणादाण नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेमडेसिविरची काळ्याबाजारात विक्री करणारा एक ...

The PCR accused escaped from the cell | पीसीआरचा आरोपी कोठडीतून पळाला

पीसीआरचा आरोपी कोठडीतून पळाला

Next

पाचपावलीतील घटना : पोलिसांची दाणादाण

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रेमडेसिविरची काळ्याबाजारात विक्री करणारा एक आरोपी पाचपावली पोलीस ठाण्यातून पळून गेला. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीपर्यंत पळालेल्या आरोपीचा शोध लागला नव्हता. उबेद रजा इकराम उल हक, असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे पाचपावलीतील मुख्य गुरुद्वाराजवळ अपोलो मेडिकल स्टोअर्स आहे. तो येथून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याची माहिती पाचपावली पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक मनीष गोडबोले यांनी सापळा रचला आणि ५० हजार रुपयांत दोन इंजेक्शन विकत घेण्यासाठी ग्राहकाला पाठविले. आरोपीने पैसे घेऊन ग्राहकाच्या हातात इंजेक्शन ठेवताच पाचपावली पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. नंतर उबेद रजा याला हे इंजेक्शन उपलब्ध करून देणारा दुसरा आरोपी अहमद हुसेन जुल्फिकार हुसेन या दोघांना पोलिसांनी २ मे ला न्यायालयात हजर करून त्यांचा तीन दिवसांचा पीसीआर मिळवला. हे दोघे पाचपावली पोलीस ठाण्याच्या कोठडीत बंद होते. मंगळवारी सायंकाळी ४.३० ते ५ वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची विक्री करणाऱ्या आरोपींवर कारवाई सुरू होती. दुसऱ्याही काही गुन्ह्यांतील आरोपी पोलीस ठाण्यात होते. पोलीस ठाण्यात अशी गर्दी झाली असताना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आरोपी उबेद रजा याने रोजा सोडण्याच्या बहाण्याने पोलिसांना हात, तोंड धुण्यासाठी कोठडीबाहेर काढण्याची विनंती केली. माणुसकीखातर एका पोलिसाने त्याला कोठडीबाहेर काढले. हात, तोंड धुतल्यावर उबेद ठाण्याच्या आवारात बसला. कारवाईच्या निमित्ताने पोलीस दुसऱ्या आरोपींच्या चौकशीत गुंतल्याची संधी साधून उबेदने ठाण्यातून पळ काढला. दरम्यान, कारवाईतून सवड मिळाल्यानंतर पोलिसांनी कोठडीत नजर टाकली असता उबेद गायब असल्याचे लक्षात आले. तो पळून गेल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी परिसरात बराच वेळ धावपळ केली. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली.

---

जागोजागी छापेमारी

उबेदला शोधण्यासाठी शहर पोलीस दलातील वेगवेगळी पथके ठिकठिकाणी छापेमारी करत होती. मात्र, उशिरा रात्रीपर्यंत तो हाती लागला नव्हता.

---

Web Title: The PCR accused escaped from the cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.