नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्प, बाेर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात १ ऑक्टाेबरपासून पर्यटन सुरू हाेणार आहे. पर्यटकांसाठी सध्या केवळ ऑफलाईन बुकिंगची सुविधा देण्यात आली आहे. काेराेना प्राेटाेकाॅलनुसार मर्यादित वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
पेंच प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक डाॅ. रविकिरण गाेवेकर यांनी सांगितले, पेंचच्या सिल्लारी, खुर्सापार, चाेरबाहुली, काेलितमारा, सुरेवानी, खुबाळा व पवनी गेट पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. सिल्लारी येथील पर्यटन संकुलाची निवास व्यवस्था १ ऑक्टाेबरपासून ऑफलाईन व ऑनलाईन अशा दाेन्ही पद्धतीने सुरू राहील. यासह बाेर व्याघ्र प्रकल्पाच्या बाेरधरण गेट तसेच उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचे कऱ्हांडला व गाेठणगाव गेट पर्यटकांसाठी सुरू करण्यात येईल. पवनी (भंडारा) पर्यटन गेटवरील ऑनलाईन बुकिंग १ नाेव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.
बाेरधरण गेटवरून सध्या केवळ १२ वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. अडेगावचा मुख्य रस्ता पावसामुळे खराब असल्याने पुढच्या आदेशापर्यंत या गेटमधून पर्यटन बंद राहणार आहे. उमरेड-कऱ्हांडला पर्यटनासाठी पवनी गेट १५ ऑक्टाेबर ते ३१ ऑक्टाेबरपर्यंत ऑफलाईन बुकिंग सुरू राहील. पर्यटकांसाठी ऑनलाईन जंगल सफारी बुकिंग व्यवस्था १६ ऑक्टाेबरपासून सुरू करण्यात येणार आहे.
काेराेना नियमांचे पालन करणे आवश्यक
काेराेना संक्रमणाची शक्यता लक्षात घेता, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, राज्य सरकार व जिल्हाधिकारी यांच्याकडून येणाऱ्या नियमांचे पर्यटकांना पालन करावे लागणार आहे. पुढच्या निर्माण हाेणाऱ्या परिस्थितीची शक्यता पाहून पर्यटन थांबविण्याबाबत वन विभाग निर्णय घेऊ शकताे.
सफारीच्या शुल्कात वाढ हाेण्याची शक्यता
वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी पर्यटनाच्या शुल्कात वाढ करण्यात आली नव्हती. मात्र यावेळी शुल्कात वाढ हाेण्याची शक्यता आहे. एखाद्या पर्यटकाने ॲडव्हान्स बुकिंग केले असले तरी नव्या रेटनुसार उर्वरित रक्कम त्यांना भरावी लागणार आहे.