नीलेश देशपांडे
नागपूर : भारतीय टेबल टेनिस खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली, असे मत नागपुरातील आंतरराष्ट्रीय पंच मंगेश मोपकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त करून खेळाडूंच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितले.
मनिका बत्रा व अचंता शरथ कमल हे तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले, ही मोठी उपलब्धी आहे. मनिका तिसऱ्या फेरीमध्ये ऑस्ट्रियाच्या सोफिया पोलकानोवाकडून पराभूत झाली, पण तिने दुसऱ्या फेरीत युक्रेनच्या पेसोटस्काचा खळबळजनक पराभव केला होता. पेसोटस्का जगातील ३२ वी मानांकित खेळाडू आहे. मनिका व सोफिया यापूर्वी २०१८ मधील अल्टिमेट टेबल टेनिसमध्ये समोरासमाेर आल्या होत्या. त्यावेळी मनिकाने तिला हरवले होते. सुतीर्थ मुखर्जीचा दुसऱ्या फेरीत पराभव झाला. त्यामुळे भारतीय महिला टेबल टेनिस खेळाडूंचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले, अशी माहिती मोपकर यांनी दिली.
आता देशाचे लक्ष केवळ शरथ कमलकडे आहे. तो मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या फेरीमध्ये चीनच्या गतविजेत्या मा लाँगसोबत झुंजणार आहे. हा सामना शरथकरिता आव्हानात्मक असेल. या सामन्याचा निकाल काय लागतो याची उत्सुकता आहे, असे मोपकर यांनी सांगितले.
भारतीय खेळाडूंसोबत बोललो असून, ते ऑलिम्पिकमधील सुविधांवर आनंदी आहेत. परंतु, कोरोनामुळे प्रेक्षक नसल्याने ऑलिम्पिकचे वातावरण उत्साही नाही. प्रेक्षकांच्या प्रोत्साहनाची आठवण येते. जगातील सर्वांत मोठा क्रीडा महोत्सव असलेल्या ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे प्रत्येक खेळाडू व क्रीडा अधिकाऱ्यांचे स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मी आनंदी आहे, अशी भावनाही यापूर्वी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम पाहिलेले मोपकर यांनी व्यक्त केली. मंगळवारपासून ते ऑलिम्पिकच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे, ६ ऑगस्टपर्यंत टेबल टेनिस सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहणार आहेत. त्यानंतर ते ९ ऑगस्ट रोजी भारतात परत येतील.